महिलेसह दोन भोंदू बाबांनी घातला 35 लाखांना गंडा

अंगात देवाचा संचार येत असल्याचे सांगून 35 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी दोन भोंदूबाबांसह त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली. या तिघांविरोधात सुमारे तीन कोटी रूपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून, त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
police arrests two conman and their accomplice for duping public
police arrests two conman and their accomplice for duping public

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन पिछाडीस असणाऱ्या मठासह कसबा तारळे येथे सात वर्षापासून हा प्रकार सुरू होता.प्रवीण विजय फडणीस (वय 55, रा. कसबा तारळे, राधानगरी), श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे (वय 50, रा. फुलेवाडी चौथा बसस्टॉप) आणि सविता अनिल अष्टेकर (वय 35, रा. मंगळवार पेठ) अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

संदीप प्रकाश नंदगावकर (वय 38) हे देवकर पाणंद येथे राहतात. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन पिछाडीस संशयित प्रवीण फडणीस, श्रीधर सहस्त्रबुद्धे या दोघांनी एक मठ सुरू केला. या मठात संशयित सविता अष्टेकर ही त्या दोघांना मदत करायची. या मठात नंदगावकर हे नित्यनियमाने कुटुंबासोबत जात होते. मठात असणाऱ्या संशयित प्रवीण फडणीस त्याचा गुरू श्रीधर सहस्त्रबुद्धे आणि त्यांची मदतनीस संशयित सविता अष्टेकर या तिघांनी मिळून फडणीस याच्या अंगात स्वामींचा संचार होऊन त्यांची ताकद त्याला प्राप्त होते तसेच, सहस्त्रबुद्धे याच्या अंगात बाबांचा संचार होतो, असे भासवून नंदगावर व त्यांच्या कुटुंबीयांचा त्या तिघांनी विश्‍वास संपादन केला. त्या आधारे 2013 पासून ते 11 मार्च 2020 अखेर त्यांच्याकडून तब्बल 35 लाख रूपये मठात आणि कसबा तारळे येथे घेतले. ही रक्कम परत केली नाही. 

नंदगावकर यांच्य भावाकडूनही त्यांनी पैसे घेतले होते. तेही त्यांनी परत केले नाहीत. नंदगावकर यांच्यासह दहा ते बारा जणांनी लाखोंची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी थेट पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केल्या. त्यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गुरूवारी (ता.28) रात्री मंगळवार पेठेतील मठात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जुना राजवाडा पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून संशयित फडणीस, सहस्त्रबुद्धे आणि अष्टेकर या तिघांना ताब्यात घेतले. त्या तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायदा 2013 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्या तिघांना सात दिवसाची कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या पथकांने केली.

पती पत्नीस अलिप्त राहण्याचा सल्ला

संशयित प्रवीण फडणीस हा भोंदूगिरी करून नागरिकांच्या धार्मिक भावनेचा गैरफायदा घेत दैवी प्रकोपाची भिती घालून पती, पत्नीस एकमेकांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला देऊन मोठ्या रक्कमेची मागणी करून गंडा घालत होता. त्याला संशयित श्रीधर सहस्त्रबुद्धे हा सावज शोधून देत असे तर त्या दोघांना संशयित सविता अष्टेकर ही मदत करत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्या तिघांविरोधात आणखी तक्रारी आल्या असून त्यांचाही चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

फसवणूक तीन कोटीच्या घरात 

भोंदूबाबांवर विश्‍वास ठेऊन रोख स्वरूपात आणि बॅंकेतून कर्जे काढून साडेतीन कोटींहून अधिकची रक्कम व साडेनऊ लाख रुपये किमंतीहून अधिकचे सोने अशी सुमारे पावणेचार कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू असून आणखी कोणाची फसवणूक झाली असले त्यांनी थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com