कोल्हापूर : लॉकडाउनमुळे रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांच्या रिझर्व्हेशनचे पैसे तब्बल 65 दिवसानंतर परत मिळणार आहेत. हे पैसे 25 मेपासून परत केले जाणार आहेत. पैसे परत घेण्यासाठी लॉकडाउनच्या तारखेपासून पुढे सहा महिन्यांची मुदत आहे. रेल्वे स्थानकावर सकाळी आठ ते रात्री आठ या दरम्यान हे पैसे परत मिळणार आहेत.
कोल्हापूर-तिरुपतीसह कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउननंतर बंद करण्यात आल्या. अनेकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वीच तिरुपतीचे आणि इतर राज्यांतील रिझर्व्हेशन केले होते. मात्र, रेल्वेगाड्याच रद्द केल्यामुळे प्रवास करणे अशक्य झाले. यानंतर केंद्र सरकारने सर्वांच्या तिकाटाचे पूर्ण पैसे परत करण्याचे जाहीर केले होते. ऑनलाइन रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांचे पैसे ऑनलाइन परत केले होते. काहींचे पैसे परत करणे शक्य झाले नाही. मात्र, रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर रिझव्हर्वेशन करणाऱ्या प्रवाशांचे पैसे अद्यापही परत मिळालेले नाहीत. हेच पैसे देण्याची प्रक्रिया 25 मेपासून रेल्वेस्थानकावर करण्यात येणार आहे.
सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान तिकटी खिडकीवर हे पैस परत केले जाणार आहेत. प्रवाशांनी गर्दी करू नये यासाठी याची मुदत सहा महिने केली आहे. तसेच खिडकीसमोर सोशल डिस्टन्सिंहसाठी चौकोन आखले आहेत. सध्या एकच खिडकी सुरू असून, आवश्यकतेनुसार खिडक्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
इतर गाड्यांचे बुकिंग नाही
सध्या तिकीट बुकींग सुरू झाले आहे. मात्र ते केवळ केंद्र सरकारने सुरू केलेल्या 200 रेल्वेगाड्यांसाठीचेच आहे. अनेक प्रवासी इतर गाड्याबाबत चौकशी करीत आहेत. मात्र अद्याप तरी रेल्वेसाठी कोल्हापुरातील कोणत्याही गाडीचे रिझर्व्हेशन सुरू केलेले नाही. काही गाड्या मिरजेतून सुटणार आहेत, तसेच देशभरातील रिझर्व्हेशन ही येथे होत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लॉकडाउनच्या काळात रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांतील प्रवाशांचे रिझर्व्हेशनचे पैसे 25 मेपासून परत दिले जातील. प्रवाशांनी पैसे परत घेण्यासाठी तिकीट खिडकीवर गर्दी करू नये. लॉकडाउनपासून सहा महिन्यांत केव्हाही हे पैसे परत मिळू शकतात. सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तास ही सुविधा कोल्हापूर रेल्वेस्थानकावर उपलब्ध असणार आहे. इतर जिल्ह्यातील तसेच, राज्यातील व्यक्ती येथे पैसे परत घेऊ शकते.
- प्यॉरेलाल मीना, मुख्य आरक्षण पर्यवेक्षक

