member of parliament dhairyasheel mane starts new kolhapur pattern | Sarkarnama

क्वारंटाइनसाठी खासदारांनी राबविला असा अनोखा कोल्हापुरी पॅटर्न

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 20 मे 2020

कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाइनसाठी स्वत:चं घर देवून 'आपुलकी गृह' या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. 

कोल्हापूर ःकोरोनाच्या भितीपोटी परजिल्ह्यातून येणाऱ्या नात्यातील लोकांसाठी अनेकांनी घराचे दरवाजे बंद केले असताना खासदार धैर्यशील माने हे क्वारंटाइनसाठी घर देणारे पहिले खासदार ठरले आहेत. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीत कडवटपणा असला तर तो संपून बंधूभाव वाढीस लागेल, हा संदेश या निमित्ताने माने यांनी दिला आहे.

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून माने यांनी गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नचा विचार दोन दिवसापूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्याची त्याच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे ही त्यांची संकल्पना होती.

गृह विलगीकरणाच्या या संकल्पनेला "आपुलकी गृहा' चे नाव देत या कोल्हापुरी पॅटर्नला हातकणंगले तालुक्‍यातील रुकडी येथील स्वत:चे घर देउन आज प्रत्यक्षात उतरविले आहे. कराड येथील महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला. कोविड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्वॅबचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली.
संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी सुविधांवर मर्यादा येत असतात. त्याचबरोबर काही प्रमाणात भेदभाव दिसून येतो. सामाजिक अंतर म्हणजे मानसिक दुरावा नाही यातून मनावर मोठा ताण येत असतो. परंतु खासदार माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करुन दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे, अशी भावना या विद्यार्थ्याने या वेळी व्यक्त केली. 

याविषयी रुकडीचे सरपंच रफिक कलावंत म्हणाले,"गावाच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या सर्व खबरदाऱ्या घेत आहोत. आपुलकी गृह ही संकल्पना केवळ मांडून थांबले नाहीत तर खासदार माने यांनी स्वत:पासून त्याची सुरुवात करुन इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. निश्‍चितपणे ही संकल्पना गावांमध्ये वाढीस लागेल.''

भाऊबंदकीत बंधूभाव वाढीस लागेल : माने 

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, माझी सामाजिक जबाबदारी म्हणून माझे घर आपुलकी गृह या संकल्पनेला दिले आहे. गावा-गावांमध्ये अशी आपुलकीची घरे निर्माण व्हावीत. सरकारवर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या ताणामुळे काही कमतरता राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लोकसहभागातून गर्भवती, वडीलधारी मंडळी, लहान मुले, नोकरीच्या निमित्ताने अथवा शिक्षणाच्या निमित्ताने अडकलेले आपलेच लोक असतील, अशांना आपुलकीच्या ओलाव्याची गरज आहे. त्यांना आपुलकी गृहाच्या माध्यमातून आधार आणि आश्रय मिळेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख