मराठीविरुध्द कन्नडीगांचा थयथयाट; मराठा विकास प्राधिकरण मागे घेण्याची मागणी - Kannad Activists demand to dissolve Maratha Development Corporation to Yediyurappa | Politics Marathi News - Sarkarnama

मराठीविरुध्द कन्नडीगांचा थयथयाट; मराठा विकास प्राधिकरण मागे घेण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

आगामी लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर डोळा ठेऊन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणाची कालच घोषणा केली. मात्र मराठीची काविळ झालेल्या कन्नडीगानी त्याविरुध्द थयथयाट सुरू केला आहे. हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा, नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा कन्नड आंदोलनकर्ते व निर्माते सा. रा. गोविंद यांनी दिला आहे.

बंगळूर : आगामी लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर डोळा ठेऊन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणाची कालच घोषणा केली. मात्र मराठीची काविळ झालेल्या कन्नडीगानी त्याविरुध्द थयथयाट सुरू केला आहे. हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा, नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा कन्नड आंदोलनकर्ते व निर्माते सा. रा. गोविंद यांनी दिला आहे.

कर्नाटकात, त्यातल्या त्यात उत्तर कर्नाटकात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाला खूश करून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशांने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी प्राधिकरणाची घोषणा केली. परंतु सातत्याने मराठीविरुध्द गरळ ओकणाऱ्या कांही कन्नडीगानी त्याविरुध्द आगपाखड करण्यास सुरवात केली आहे.

कन्नड होराटगार सा. रा. गोविंद यांनी तर मराठी, महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते व महाराष्ट्रातील नेत्यांविरुध्द आज गरळ ओकली व मुख्यमंत्र्यांना मराठा प्राधिकरणाचा निर्णय मागे घेण्यास बजावले. ते म्हणाले, मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून मराठा समांजाला अशा प्रकारची दिवाळी भेट अपेक्षित नव्हती. मुख्यमंत्र्यांना हा सल्ला कोणी दिला माहित नाही. महाराष्ट्र एकिकरण समिती बेळगावात दरवर्षी काळा दिन साजरा करते. बेळगावात मराठीकडून कन्नडीगांवर दडपशाही करण्यात येते. महाराष्ट्राचे नेते बेळगावात येऊन प्रक्षोभक भाषण करतात, असाही त्यांनी आरोप केला.

समिती किंवा सीमाभागातील मराठी लोक आपल्या घटनात्मक हक्कासाठी लढत आहेत, याकडे दुर्लक्ष करून त्यांनी सीमाभागातील मराठी लोकांविरुध्द गरळ ओकली. मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी नाही, तर मराठा समाजासाठी प्राधिकाराची घोषणा केली आहे, याची जाणीव गोविंद यांना नसावी, ही खेदजनक बाब आहे. मराठा समाजाचे लोक केवळ सीमा भागातच नाही, तर कन्नड बहूल प्रदेशांतही आहेत, याचे भान त्यांना असायला हवे होते.

मराठा प्राधिकाराची स्थापना करून कन्नड विकास प्राधिकरण मुख्यमंत्री बंद करणार आहेत का ? असा अजब सवाल त्यांनी केला आहे. उद्या तमिळ, आंध्राचे लोकही अशा प्राधिकरणाची मागणी करतील, अस सांगून त्या सर्वांसाठीच अशा प्राधिकणाची ते स्थापना करणार का ? असाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला आहे. मराठा विकास प्राधिकरण कन्नडीगांना मान्य नसल्याचे सांगून हा निर्णय मागे घेण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख