महाडिकांकडून भ्रष्टाचाराबद्दल टार्गेट होत असलेले सतेज पाटील किती श्रीमंत?

गोकूळच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे वाभाडे काढण्याचे काम सुरू....
satej patil-ruturaj patil
satej patil-ruturaj patil

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक (गोकूळ) अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीत संघातील सत्ताधारी महादेवराव महाडिक आणि विरोधक राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याच आरोपाचा धुरळा उडाला आहे. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे नेतेमंडळी कशातून पैसे कमवतात, याचा पोलखोल यानिमित्ताने झाला आहे.

या निवडणुकीचे मतदार हे आपापल्या पॅनेलकडून सहलीवर असले तरी इतर सभासदांसमोर हा प्रचाराचा धुरळा उडाला. महाडिकांनी गोकूळमधील टॅंकरच्या टेंडरमधून पैसे कमावल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला तर सतेज पाटील यांनी शिक्षणाच्या बाजारीकरणातून पैसे हडपल्याचा आरोप महाडिकांनी केला.

या साऱ्या परिस्थितीत सतेज पाटील यांची संपत्ती किती, याची माहिती घेतली असता ताजी माहिती मिळू शकली नाही. कारण त्यांनी 2015 मध्ये विधान परिषद निवडणूक लढविली होती. त्या वेळी  त्यांनी सादर केेलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती सध्या खुली आहे.  सहा वर्षांपूर्वी सतेज पाटील यांच्याकडे 25 कोटी 57 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे त्यावरून समजते. त्यांच्यावर तेव्हा चार कोटी नऊ लाख रूपयांचे कर्जही असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीच्या मिळून तेव्हा दोन कोटी 67 लाख रुपयांच्या ठेवी  विविध बॅंका आणि आर्थिक संस्थांत होत्या. तसेच दहा कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (2015 च्या भावानुसार) असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांच्याही संपत्तीची माहिती या निमित्ताने घेतली असता ते सुमारे 34 कोटी 39 लाख रुपयांच्या मालमत्तेचे धनी असल्याचे दिसून येते. अर्थात त्यांच्यावर 17 कोटी 66 लाख रुपयांचे कर्जही आहे. ऋतुराज हे 2019 च्या निवडणुकीत आमदार झाले असल्याने त्यांच्या संपत्तीची माहिती तुलनेने ताजी आहे. त्यांनी विविध त्यांच्या कंपन्यांना कर्ज मोठ्या प्रमाणात दिल्याचे दिसून येत आहे. पोर्शेची गाडीही त्यांच्या ताफ्यात आहे. हे दोघे काका-पुतणे मिळून सुमारे 50 कोटींच्या मालमत्तेचे मालक असल्याचे या कागदपत्रांतून दिसते. 

ठरावदार मात्र सहलीवर
एकीकडे नेत्यांच्या प्रचार सभा सुरू असताना त्यातील आरोप-प्रत्यारोप ऐकायला ठरावदार मात्र नाहीत. बहुतांश ठरावदारांना दोन्ही आघाड्यांकडून सहलीवर पाठवले जात आहे. त्यामुळे ठरावदार नसताना होत असलेल्या टीका चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com