चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही : मुश्रीफांचा पलटवार  - Hassan Mushriff Answers Chandrakant Patil Statement | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही : मुश्रीफांचा पलटवार 

सुनील पाटील
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोथरुड विधानसभा मतदार संघातून आमच्या भगिनी सौ. मेघा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील निवडून आलेत, त्यांना कोल्हापूरात निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून परवानगी कशी मिळेल? या दोन्ही गोष्टी केवळ अशक्‍य आहेत असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केला

कोल्हापूर : ''कोथरुड विधानसभा मतदार संघातून आमच्या भगिनी सौ. मेघा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील निवडून आलेत, त्यांना कोल्हापूरात निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून परवानगी कशी मिळेल? या दोन्ही गोष्टी केवळ अशक्‍य आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही. त्यांची याच ठिकाणी गरज आहे,'' असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. 

भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही. निवडून आलेले राजीनामा देणार नाहीत आणि त्यांनी का द्यावा? या सर्व गोष्टी अशक्‍य आहेत. हे चंद्रकांत पाटील यांना माहिती आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. काम करीत राहा,  हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो. पुण्यात सुरक्षित म्हणून नव्हे तर पक्षाने सांगितले म्हणून आलो. माझी कोल्हापुरा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी होती. पक्षाच्या आदेशानुसार मी पुण्यात लढण्यासाठी आलो. माझे आजही आव्हान कायम आहे. मी कोल्हापुरात निवडणूक लढवायला आताही तयार आहे. निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य पाटील यांनी पुण्यात काल केले होते. 

श्री मुश्रीफ म्हणाले, ''श्री पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्‍यकता नाही. कोल्हापूरमधून निवडून आले नाहीत म्हणून आम्ही टीकाही केली नाही. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाले आहे. पुन्हा चार वर्षांनी या निवडणुका होतील. वारणा येथे चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत ते तसे करू शकतात, असे म्हटले आहे. म्हणजे, त्यांनी त्यांच्या विधानाला पुष्टी दिली आहे,'' 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख