hasan mushrif targets bjp leader over politics on corona crisis | Sarkarnama

मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात, भाजपकडून महाराष्ट्राशी द्रोह

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी उभा महाराष्ट्र जीवाचं रान करून लढत आहे. भाजपवाले मात्र कुठे टाळ्या वाजव, कुठे थाळ्या वाजव आणि आज काय तर काळे झेंडे दाखवा, असे प्रकार करून ते महाराष्ट्राशी द्रोह करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

कोल्हापूर : कोरोनाशी संघर्ष करताना, झुंज देताना गेले दोन-अडीच महीने प्राणांची बाजी लावून डॉक्‍टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, ग्रामदक्षता समित्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका हे सर्वजण लढत आहेत. या सगळ्या योद्‌ध्यांचा अपमान भाजप करीत आहे, अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

ते म्हणाले, की कोरोनामुळे चीन, अमेरिका या देशांमध्ये कितीतरी मृत्यू होत आहेत, कितीतरी लोक बाधित आहेत. त्यामानाने महाराष्ट्राने सर्वांत आधी लॉकडाऊनचे पाऊल उचलले. कोरोनामुळे सुरुवातीला महाराष्ट्राने अधिवेशन बरखास्त केले आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन बरखास्त झाले. मध्य प्रदेशच्या राजकारणापायी केलेल्या या खटाटोपात या मधल्या काळात 35 लाख लोक परदेशातून आले आणि हा संसर्ग वाढतच गेला. वेळेवर जर लॉकडाऊन केल असतं तर 135 कोटी लोकांना घरात बसावे लागले नसते.

वास्तविक, भाजपने आम्हाला सूचना करायला हव्या होत्या, अशा काळात सहकार्य करायला हवे होते. परंतु; ते सातत्याने राजकारणच करीत आहेत. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आता लोकांच्या डोळ्यासमोर आला आहे. मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्र हे देशाचं महाद्वार आहे. येथे सुरुवातीला परदेशातून लोक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा संसर्ग वाढतच गेला. ग्रामीण भागात अतिशय चांगले वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यात जर हा संसर्ग रोखू शकलो तर अजूनही चांगलं होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 
`पीएम केअर`मधून किती पैसे महाराष्ट्राला दिले, या प्रश्नावर ते म्हणाले, `पीएम केअर`ला सगळे पैसे मुंबईमधून गेले आणि आम्हाला अवघे चारशे कोटी दिले. तिकडे उत्तर प्रदेशला मात्र पंधराशे कोटी दिले. हा कुठला न्याय आहे ? 

मोदी कुठे पीपीई किट घालून फिरतात

मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजप सातत्याने बोलत आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे पीपीई किट घालून हिंडत आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाले आहेत. त्या नैराश्‍यातूनच ते सतत राज्यपालांकडे जाऊन तक्रारी करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख