मराठा समाजाप्रमाणे धनगरांनी एकजूट दाखवावी 

समाजातील नेत्यांनी सोयीनुसार स्वतंत्रपणे आंदोलने करू नयेत.
Dhangars should show unity like the Maratha community
Dhangars should show unity like the Maratha community

कोल्हापूर : "धनगर सारा एक' भावनेतून धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार आज (ता. 2 ऑक्‍टोबर) येथे धनगर समाजाने ऐतिहासिक पहिल्या गोलमेज परिषदेत केला. 

समाजातील विविध संघटनांचे प्रमुख, आजी-माजी आमदार, खासदार व अन्य मान्यवरांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, मुंबई, लातूर, उस्मानाबाद, पुणे येथील बांधवांनी परिषदेस सहभाग घेतला. ताराराणी चौकातील अक्षता मंगल कार्यालयात परिषद झाली. 

डांगे म्हणाले, ""आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन शांततेने होणे आवश्‍यक आहे. ते सर्व समाज घटकांना सोबत घेऊन व्हायला हवे, तरच धनगर समाज सरकारला एसटीचे आरक्षण मिळविण्यास भाग पाडू शकतो. मराठा समाज आरक्षणासाठी कशा पद्धतीने एकत्र आला आहे, याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांची भाषासारखी आहे. जे मनात येईल ते बोलणार, असे ते करत नाहीत. त्यांच्यातील लढाईचा धागा समान आहे. त्यामुळे ते म्हणतील ते निर्णय घेणे राज्य सरकारला भाग पडत आहे. धनगर समाजानेही एकत्र येऊन आरक्षणापासून अडवणूक का होते, याचा विचार करायला हवा. ही लढाई एकट्या दुकट्याची नाही.'' 

माजी मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, ""धनगर समाजाला राज्य घटनेने दिलेले आरक्षण मिळालेले नाही. सर्व पक्षांचे धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. नेता, पक्ष, संघटना भेद सोडून एकीची वज्रमूठ बांधण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी समाजाचा दबाव नेत्यांवर असायला हवा.'' समाजातील ज्या कार्यकर्त्यांनी नेता व्हायचे आहे. त्यांनी स्वकर्तृत्वावर व्हावे, असेही त्यांनी सांगितले. 

माजी आमदार रामराव वडकुते म्हणाले, "समाजातील नेत्यांनी सोयीनुसार स्वतंत्रपणे आंदोलने करू नयेत. एकाच झेंड्याखाली येऊन आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करावी.'' 

माजी आमदार ऍड. रामहरी रूपनवर, मधुकर शिंदे, बबन रानगे यांनी ऑनलाइन माध्यमातून भूमिका मांडली. या वेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ऍड. रणजित गावडे यांनी धनगर समाजातील वकिलांची राज्यव्यापी गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणा केली.

भूषणसिंहराजे होळकर, डॉ. शशिकांत तरंगे, नवनाथ पडळकर, सुरेश कांबळे, विष्णू माने, प्रवीण काकडे, बयाजी शेळके, विक्रम डोणे, सिद्धार्थ बन्ने, पांडुरंग मिरगळ, ललिता पुजारी यांची भाषणे या वेळी झाली. परिषदेचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

परिषदेतील ठराव 

►महाराष्ट्रातील धनगर समाज 32 पोटशाखांत विखुरला आहे. प्रत्येक पोटशाखेचा कोणी ना कोणी नेता आहे. धनगर संघटनांचे प्रमुख आजी-माजी आमदार, खासदार व मान्यवर व्यक्ती आहेत. त्यांनी "धनगर सारा एक' या भावनेतून आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी एकत्रित येऊन आंदोलन करावे. 
► धनगर समाजातील प्रमुख आजी-माजी आमदार, खासदार व अन्य मान्यवरांची गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढविण्यासाठी व दिशा ठरविण्यासाठी पुन्हा बैठक बोलाविण्यात येईल. 
►मेंढपाळ बांधवांना दररोज नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यात अलीकडे शेळ्या-मेंढ्या चोरून विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांना आळा बसावा व शेळ्या-मेंढ्यांच्या संगोपनासह चराई व सुरक्षेबाबत सरकारने सर्वंकष कायदा करून मेंढीपालन व्यवसाय विकासाचा मार्ग तयार करावा. 
►आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर डे टू डे सुनावणी घेऊन तत्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com