अजित पवारांनी शिवेंद्रराजेंना सुनावले! - Deputy CM Ajit Pawar slams MLA Shivendraraje Bhosale over his comment on shashikant shinde | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांनी शिवेंद्रराजेंना सुनावले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

'माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही,' अशी जाहीर धमकी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिली आहे.

मुंबई : 'माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही,' अशी जाहीर धमकी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिली आहे. या धमकीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रराजेंना सुनावले आहे. 'कार्यकर्त्यांना जवळ ठेवण्यासाठी कोणी काही बोलत असतात , पण त्याला घाबरण्याचे कारण नाही,' अशी प्रतिक्रिया पवारांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावर दिली. 

जावळी तालुक्यातील कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली. 'मी उदयनराजे भोसले यांना पराभूत केलेला आमदार असून मी कुरघोड्या करत नाही. शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. तसा कोणताही प्रयत्न मी केलेला नाही. माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही, असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात अर्थ नसतो. कार्यकर्त्यांना जवळ ठेवण्यासाठी कोणी काही बोलत असतात. पण त्याला घाबरण्याचे कारण नाही.'

काय म्हणाले होते शिवेंद्रराजे?

शिवेंद्रराजे म्हणाले, मी जर एखादी गोष्ट केली असेल तरच केली म्हणा, न केलेल्या कामाचे खापर माझ्यावर फोडू नका, ते मला कधीच मान्य नसेल, असले राजकारण करायचे असते तर शशिकांत शिंदे ज्यावेळी जिल्ह्यात आले त्याच वेळी त्यांच्या विरोधात काम केले असते. पण शरद पवार साहेबांनी जी दिलेली जबाबदारी ती आम्ही पार पाडली होती. कोरोगावच्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता हा शशिकांत शिंदेच्या बरोबरच होता.

मी खुनसी प्रवृत्तीचे राजकारण कधीच करत नाही, ज्याला माझे पटत नसेल त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे, जे सच्चे आहेत, एकनिष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे, माझ्या जास्त सभ्य व शांत राहण्याचा काहीजन गैरफायदा घेतात पण यापुढे ते चालणार नाही, मी जरी भाजपात असलो तरी माझी राज्याच्या राजकारणात कीती ताकद आहे, माझ्या शब्दाला किती किंमत आहे हे मला माहिती आहे. ते मी मतदारसंघात करत असलेल्या कामांवरून मी ते दाखवूनही दिले आहे.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख