नारायण राणेंना गणरायाच बुद्धी देवो! : दीपक केसरकर यांचा टोला

या आनंदाच्या प्रसंगात विघ्न आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
नारायण राणेंना गणरायाच बुद्धी देवो! : दीपक केसरकर यांचा टोला
Deepak Kesarakar & Narayan Rane (7).jpg

सावंतवाडी :  चिपी विमानतळावरून (Chipi Airport) वाद निर्माण होणे दुर्दैवी आहे. केंद्राच्या परवानग्या लागल्या तरी, चिपी विमानतळ हे महाराष्ट्र शासनाचे आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरविण्याचा अधिकारही राज्यालाच आहे. काहींना केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याची इच्छा आहे,  मात्र  गणपती त्यांना चांगली बुद्धी देवो, अशी अप्रत्यक्ष टिका आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.

केंद्रीय मंत्री राणे यांनी चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ला होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत टिका केली. केसरकर म्हणाले, “चिपी विमानतळासाठी लागणारे आवश्यक सगळ्या गोष्टीची पूर्तता करूनच केंद्राकडून परवानग्या घेतल्या आहेत. मुळात या विमानतळावरून राज्य आणि केंद्र सरकार असा संघर्ष होऊ नये, अशी आपली इच्छा आहे; मात्र काहींना वाद निर्माण करण्याची इच्छा आहे.

विमानतळ हे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे आहे. त्याला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सुरुवातीपासूनच गती देण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी विमान वाहतूक सुरू होणार ही आनंदाची गोष्ट आहे. या आनंदाच्या प्रसंगात विघ्न आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. जर कोण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तर गणपती त्याला चांगली बुद्धी देवो तसेच, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात.”

केसरकर पुढे म्हणाले, “केंद्र आणि राज्य शासनाचे कर्तव्य वेगवेगळी आहे. त्यामुळे दोघांची भूमिका ही नेहमी समन्वयाची राहणे गरजेचे आहे, मात्र हा संघर्ष सुरू झाल्यास तो कोकण, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या हिताचा नसणार आहे. काहींना राजकीय फायदा उठवायचा असल्याने ते हा वाद निर्माण करून आपला फायदा बघत आहे. चिपी विमानतळासाठी याठिकाणी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. येथील पर्यटन वाढावे, उद्योग व्यवसाय वाढावे हा प्रत्येकाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे या ठिकाणी विमान वाहतूक सुरू झाल्यास सिंधुदुर्गसाठी ती आनंदाची गोष्ट ठरणार आहे.”

रेडीत पर्यटन प्रकल्प आणणार

 “मी अलीकडे संघर्ष तसेच राजकारणापासून काहीसा लांब आहे; मात्र, तसे असले तरी जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहे. मतदारसंघात ज्या लोकांना आपण शब्द दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी माझा नियमित प्रयत्न राहिला आहे. लवकरच रेडी येथे तिलारी येथील अम्युझमेट पार्कसारखा आणखी एक नविन प्रकल्प आणणार आहे. यातुन अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. लवकरच याबाबत आपण घोषणा करणार असल्याचे केसरकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in