कोल्हापूर : धनगर सामाजाचे आणि छत्रपती घराण्याचे संबंध पूर्वीपासून आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला केवळ पाठिंबाच नव्हे, तर त्यासाठी आम्ही पाठपुरावाही करणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाची जी व्याख्या केली, त्यामध्ये धनगर समाजाची समावेश होता. त्यामुळे मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करणे, ही आमची जबाबदारी आहे, असे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माजी गृहराज्य मंत्री राम शिंदे यांना दिले.
धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या गोलमेज परिषदेनंतर आज (ता. 2 ऑक्टोबर) प्रा. शिंदे यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे यांनी वरील भूमिका मांडली.
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी आज कोल्हापुरात गोलमेज परिषद झाली. खासदार संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यावा, यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी गोलमेज परिषदेचा उद्देश, धनगर आरक्षणाचा लढा याबाबत संभाजीराजे यांना माहिती दिली.
या वेळी आपली भूमिका मांडताना संभाजीराजे म्हणाले,"कोल्हापुरात गोलमेज परिषद झाली, याचा आनंद आहे. या नगरीला राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा लाभला आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जे आरक्षण दिले, त्यामध्ये एस.सी., एस.टी, ओबीसी, मराठा या समाजांचा समावेश होता.
राजर्षी शाहू महाराजांनी पहिला आंतरजातीय विवाह आपल्या जनकघराण्यातील बहीण चंद्रप्रभा घाटगे यांचा केला. धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी त्यांनी चंद्रप्रभा यांचे लग्न लावून दिले होते. तेव्हा पासून आमच्या घराण्याची नाळ धनगर समाजाशी जोडली गेली आहे.
धनगर समाजाच्या प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणे, ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही मी प्रयत्न करेन.'