मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मनापासून आग्रही आहे का? : शाहू महाराजांचा सवाल 

केंद्र व राज्य सरकारकडे नेमके काय मागायचे, याची दिशा निश्‍चित हवी.
Is the Central Government sincerely insisting on Maratha reservation? : Question of Shahu Maharaj
Is the Central Government sincerely insisting on Maratha reservation? : Question of Shahu Maharaj

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विखुरलेल्या मराठा समाजाने एकत्र यावे, असे आवाहन करत सारथी संस्थेला स्वायत्तता का दिली जात नाही?, असा प्रश्‍न श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज (ता. 15 ऑक्‍टोबर) येथे उपस्थित केला. 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण व सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी याकरिता "आधी लाल महाल मग लाल किल्ला' असे आंदोलन छेडण्याचा ठराव करण्यात आला. लाल महाल येथे 29 ऑक्‍टोबरला आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी बैठक होणार असून, दिल्लीत मराठ्यांची ताकद दाखविण्यात येणार आहे. सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात ते बोलत होते. 
या वेळी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, नगरसेविका रूपाराणी निकम, ऍड. गुलाबराव घोरपडे प्रमुख उपस्थित होते. 

शाहू महाराज म्हणाले, "केंद्र व राज्य सरकारकडे नेमके काय मागायचे, याची दिशा निश्‍चित हवी. अन्य संस्थांना स्वायत्तता असताना सारथीला का नाही, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा आरक्षणाचा लढा सर्वोच्च न्यायालयात जिंकायचा असून, त्याकरिता राज्य व केंद्र सरकारच्या पाठबळाची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकार मनापासून मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रही आहे का, हे तपासून पाहावे लागेल. केंद्र सरकारचा दबाव नसेल तर काहीच होणार नाही; अन्यथा आपण केवळ आरक्षणासाठी भांडत राहू.'' 

ते म्हणाले, ""खासदार व आमदारांनी पुढे येऊन आरक्षणाच्या अनुषंगाने ठराव मंजूर करावेत. त्याचबरोबर समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लक्ष द्यावे. कृषी, उद्योगधंदे, स्पर्धा परीक्षेत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. राजकीय दृष्ट्यासुद्धा समाजाने एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे. मराठा समाज अडचणींवर मात करणारा आहे. समाजाने भावनांवर नियंत्रण ठेवावे.'' समाजाच्या आंदोलनात मी सेवक म्हणून सहभागी होणार आहे. छत्रपती म्हणून नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

मेळाव्यातील ठराव 
►सारथी बचाव संकल्प यात्रा-सकल मराठा समाज पुण्यात लाल महालात 29 ऑक्‍टोबरला एकवटणार 
►तत्पूर्वी 19 ऑक्‍टोबरला राज्य सरकारला सारथी संस्थेची स्वायत्तता व अन्य मागण्यांसाठी निवेदन देणार 
►मागण्यांची पूर्तता न केल्यास 29 ऑक्‍टोबरला लाल महालात आंदोलनाची दिशा ठरणार 
►मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत होणाऱ्या आंदोलनाची जबादारी सरकारची राहील 
► राज्य सरकारने अखत्यारीतील मागण्यांची पूर्तता तातडीने करावी. 
अ) प्रवेश प्रक्रियेत एसईबीसी अंतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवेश संरक्षित करावा 
ब) 20 शासकीय विविध विभागात विभागातील स्थगितीपूर्व मराठा निवड उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्‍त्या ताबडतोब द्याव्यात 
►अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने विद्यार्थी शिक्षण कर्ज योजना सुरू करावी. लाभार्थी संख्या वाढवावी. 
►दसरा चौक ठिय्या आंदोलन काळात आत्मबलिदान दिलेल्या विनायक परशराम गुदगी यांच्या वारसास नोकरी व मदत त्वरित द्यावी 
► कोपार्डीच्या बहिणीला न्याय द्यावा 
►सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावा 
►केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला धोका होऊ नये, म्हणून कायद्यात बदल करावा; अन्यथा फेब्रुवारीत अधिवेशन काळात "चलो दिल्ली' आंदोलन करणार. मराठा आरक्षण कायदेशीररित्या मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवणार 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com