निवडणूक आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस!  - BJP Trying to find Marathi Face in Belgaum for By-polls | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने मराठी चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक मराठी भाषिकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली, तरी पक्षातील काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने मराठी चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक मराठी भाषिकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली, तरी पक्षातील काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी झाली. अंगडी यांच्या समर्थकांनी त्यासाठी मोहीमही चालविली. परंतु, काही दिवसांपासून ही मागणी बाजूला पडल्याचे चित्र आहे. भाजपकडून उमेदवार निवडीवेळी धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो, अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. त्यात मराठा किंवा मराठी कार्ड वापरले जाणार असल्याची चर्चाही आहे. बेळगाव मतदारसंघातील मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. त्याचा फायदा पुढील विधानसभा निवडणुकीत होईल, असे पक्षनेतृत्वाला वाटते. 

दिवंगत सुरेश अंगडी यांनी सलग चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 2004 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करुन अंगडी लोकसभेवर निवडून गेले. अर्थात त्यावेळी त्यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. 

2009 व 2014 मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. 2019 मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात होता, पण आधीपेक्षा त्यांचे मताधिक्‍य वाढले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. खासकरुन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. अर्थात भाजपने मराठी उमेदवार दिला तर कन्नडबहुल भागात मतदान होणार का, याची चाचपणीही सुरू आहे. 
दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे मराठी उमेदवार निवडून येणे शक्‍य असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. 

सोळा वर्षांपासून भाजपचे प्राबल्य 
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांत मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. यापैकी दक्षिण व उत्तर या दोन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. याशिवाय रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक व आरभावी या मतदारसंघांतही भाजपचे आमदार आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे गोकाकचे आमदार आहेत. बेळगाव ग्रामीण व बैलहोंगल या दोनच मतदारसंघांत कॉंग्रेसचे आमदार आहेत. सोळा वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य असून त्या जोरावर मराठी उमेदवार निवडून येऊ शकतो, असे स्थानिक नेत्यांना वाटते.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख