किरीट सोमय्यांचे आरोप खोडून दाखवा : चंद्रकांत पाटील यांचे आव्हान - BJP State President Chandrakant Patil Challenged Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

किरीट सोमय्यांचे आरोप खोडून दाखवा : चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

ओंकार कदम
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार या लोकशाहीत आहेत त्यांनी ते खोडावेत. तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही खोडावेत, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले.

सातारा : किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार या लोकशाहीत आहेत त्यांनी ते खोडावेत. तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही खोडावेत, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले.

साताऱ्यात आज भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकात पाटील यांना किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेऊन अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, ''किरीट सोमय्या यांनी ठोस कागदपत्रे बाहेर काढली आहेत. ती खोटी वाटत असतील तर शिवसेनेने न्यायालयात जावे,"

अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. त्यावरुन शिवसेना नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य बनवत आहेत. आज साताऱ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोमय्यांची पाठराखण केली.

या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का? असा सवाल त्यांनी केला. आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही, असे विचारत ते म्हणाले, "मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. गेल्या ११ महिन्यांपासून या सरकारचा जो हैदोस चालू आहे तो सर्वसामान्य जनता पाहत आहे,"

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आत्मचरित्रामध्ये राहुल गांधींचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा केला आहे या प्रश्नावर ''या विषयी मला माहित नाही पण असला प्रश्न संजय राऊत यांना विचारा,'' असा टोला पाटील यांनी लगावला.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख