गुन्हेगारांचे राजकीय लागेबांधे तपासणार : शंभूराज देसाई - Will Check Political Connections of Criminals Say Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्हेगारांचे राजकीय लागेबांधे तपासणार : शंभूराज देसाई

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

गुंड प्रवृत्तींना कोणी राजकीय व्यक्ती पाठीशी घालतेय का, याचा तपास पोलिस करत असून, तसे होत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला

सातारा  : जिल्ह्यात वाढलेले खुनाचे प्रकार लक्षात घेता पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याची सूचना पोलिस अधीक्षकांना केल्या आहेत. गुंड प्रवृत्तींना कोणी राजकीय व्यक्ती पाठीशी घालतेय का, याचा तपास पोलिस करत असून, तसे होत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

जिल्ह्यात खुनाच्या घटना घडल्या असून, गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पोलिसांना काही सूचना केल्या आहेत का, या प्रश्‍नावर मंत्री देसाई म्हणाले, "जिल्ह्यात मागील चार पाच दिवसांत पाच खुनांच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांत संशयितांना राजकीय लोकांचे पाठबळ मिळतेय का, त्यांचे काही लागेबांधे आहेत का, याची माहिती पोलिस घेत आहेत. पाचही खुनांतील संशयितांना तत्काळ पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांना कठोर शासन होईल, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करणार आहे. गुंड प्रवृत्तींना कोणी पाठीशी घालत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई होईल.''

''जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी रात्रगस्त वाढविण्यात येणार असून, रात्रगस्तीचा कालावधी व राउंडही वाढविले जातील. पाच ही खुनांच्या बाबतीतील तपासणी अहवाल पोलिस अधीक्षकांकडून मागविला आहे. त्यामुळे आगामी काळात खुनाच्या घटना घडू नयेत, यासाठीची पावले पोलिसांकडून उचलली जातील.'' असेही ते म्हणाले.

आमदारकीच्या यादीत नाव आल्यापासून प्रा. नितीन बानुगडे शांत झाले आहेत, याचे कारण विचारले असता प्रा. बानुगडे म्हणाले, "पक्षाकडून दिलेल्या जबाबदारीनुसार मी पक्ष संघटना बांधणीचे काम सातत्याने व शांत राहून कुठेही प्रकाशात न येता करत आहे. पक्ष पुढे नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता राज्यपाल त्यांचा निर्णय घेतील; पण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीच्या यादीत नाव घालण्याइतके मला पात्र समजले हेच माझे मी भाग्य समजतो.''

पक्षप्रमुखांचा आदेश आल्यास तयारी
सह पालकमंत्रिपदासाठी तुमच्या नावाची चर्चा असून, याबाबत मागणी होऊ लागली आहे. या प्रश्‍नावर मंत्री देसाई म्हणाले, "मुळात तो धोरणात्मक निर्णय आहे. त्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यांच्या अधिकारात मी हस्तक्षेप करू शकत नाही; पण पक्षप्रमुख व पक्ष जो आदेश देईल, त्याप्रमाणे शंभर टक्के काम करण्यास मी तयार आहे.''
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख