सेनेच्या नादाला लागाल, तर संपाल; शिवसेनेचे प्रमोद जठारांवर टीकास्त्र - Shivsena Leader warns BJP Leader Pramod Jathar over Nanar Refinery | Politics Marathi News - Sarkarnama

सेनेच्या नादाला लागाल, तर संपाल; शिवसेनेचे प्रमोद जठारांवर टीकास्त्र

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, राज्य सचिव प्रमोद जठार यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. शिवसेनेच्या नादाला लागाल, तर तुम्हीच संपून जाल, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिले.

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्माण केलेले शिवसेना एक अस्त्र आहे. ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, तेच संपले. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, राज्य सचिव प्रमोद जठार यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. शिवसेनेच्या नादाला लागाल, तर तुम्हीच संपून जाल, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिले.

भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेना संपेल, शिवसेना सत्तेतून उतरेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी नाणार रिफायनरीची अधिसूचना काढली जाईल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा महाडिक यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, कोकणात अनेक समस्या असताना प्रमोद जठारांना फक्त रिफायनरीच दिसते आणि ही रिफायनरी केव्हाच रद्द झाली आहे. त्यामुळे रिफायनरीचे स्वप्न प्रमोद जठारांनी पाहू नये आणि शिवसेना सत्तेतून उतरेल, या भ्रमातही राहू नये. शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे. २०१४ ते २०१९ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होता. केंद्रात तर तुमचे सरकार आहे. मग तुम्ही रिफायनरीची एक वीटपण का लावू शकला नाहीत. शिवसेना आणि ग्रामस्थांमुळेच हा रिफायनरी प्रकल्प रद्द करावा लागला होता, तरी जठार हे रिफायनरीची स्वप्ने पाहत आहेत.

सेनेमुळेच युतीचे आमदार म्हणून निवडून आला..
सेनेवर टीका करण्याआधी प्रमोद जठार यांनी आपण शिवसेनेमुळेच युतीचे आमदार म्हणून निवडून आला होतात, त्यानंतर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला, याची जाणीव ठेवावी. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपून गेले आहेत, हे इतिहास सांगतो. त्यामुळे शिवसेनेच्या नादाला तुम्ही लागाल तर तुम्हीच संपून जाल, असाही टोला महाडिक यांनी त्यांना लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख