विक्रमी अर्जामुळे धाकधुक वाढली; अनेकाकडून बंडखोरीचा पर्याय  - Record Number of Applications filed for Grampanchayat Elections | Politics Marathi News - Sarkarnama

विक्रमी अर्जामुळे धाकधुक वाढली; अनेकाकडून बंडखोरीचा पर्याय 

गजानन पाटील
रविवार, 3 जानेवारी 2021

पेड परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गुरुवार दि. ३१ डिसेंबरच्या छाननीनंतर माघारीची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक इच्छुकांची धाकधुक मोठया प्रमाणात वाढली आहे. बुधवार दि. ३० रोजी अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने आपलाच अर्ज टिकविन्यासाठी अनेकांनी आटापीटा चालविला आहे.

पेड : पेड परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गुरुवार दि. ३१ डिसेंबरच्या छाननीनंतर माघारीची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक इच्छुकांची धाकधुक मोठया प्रमाणात वाढली आहे. बुधवार दि. ३० रोजी अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने आपलाच अर्ज टिकविण्यासाठी अनेकांनी आटापीटा चालविला आहे.

सोमवार दि. ४ जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने छाननीनंतर रात्र नेतेमंडळी व उमेदवारांनी व्युहरचनेत घालविली. यात मुळातच इच्छुकांची यादी फुगल्याने नेतेमंडळी समोर कुणाला उमेदवारी द्यायची, हा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या गर्दीत अमुक एका गटाची उमेदवारी कोणाला मिळेल, याची उत्सुकता केवळ रांगेत सर्वात पुढे असलेल्यांनाच आहे. त्यामुळे इतरानी मात्र बंडखोरीचा पर्याय स्वीकारत प्रचाराची तयारी चालविली आहे .

आम्ही गटाशी, पक्षाशी, नेत्यांशी एकनिष्ठ राहिलो. आजतागायत प्रामाणिकपणे काम करीत आलो आहे . आता पदाची संधी आली, तर मात्र भलत्याच लोकांना प्राधान्य देण्यात आहे. काय चुकले म्हणून उमेदवारी नाकारली. असाच अनेक इच्छुकांचा सवाल आहे. मी किती एकनिष्ठ राहिलो, हे सांगत त्यांनी नेत्यासमोर प्रामाणिकपणाचा दृष्टांत देण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही ठिकाणी इतर वॉर्डातील जाणीव पूर्वक उमेदवार आयात केले आहेत.

माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही उमेदवारी मिळू शकत नाही, अशा भाबडया आशेवर अनेकजण विसबूंन राहिले. मात्र त्यांना गावठी पुढाऱ्यांनी खडयासारखे बाजूला काढले. त्यामुळे ज्याची टिमकी वर्षानुवर्षे वाजविली त्याच टिमकीचे चामडे मऊ झाल्यामुळे इच्छुकांनी वॉर्डातील सच्चा कार्यकर्त्याचा आधार घेतला आहे. दगाफटका झाल्याचे स्पष्ट होऊ लागलेल्या इच्छुकांनीही कंबर कसली आहे. काहीही होवो, आपली ताकद नेत्यांना दाखवु, असा निर्धार इच्छुकांनी व्यक्त केला आहे. पैशाच्या आणि दमदाटीच्या राजकारणात, कार्यकर्त्यांना निवडून देण्याचा पायंडा पुन्हा सुरु करू अशी अपेक्षा फटका बसलेल्या इच्छुकांनी बाळगली आहे .

यंदा गावागावातील प्रत्येक वॉर्डातील उमेदवारांची पैसा, प्रतिष्ठा, शक्ती पणाला लागली आहे. यावेळी उमेदवारांनी ग्रामपंचायतीमध्ये नव्याने ओळख तयार करण्यासाठी टोकाची ईर्ष्या सुरु झाली आहे. पाच, पन्नस मतांमध्ये हातातोंडाला आलेला विजय दुरावु नये, यासाठी आखाडयातील पैलवानांची संख्या कमी करण्यावर भर सुरु आहे. एक - एक मत लाखमोलाचं मानुन आपली मते खाणाऱ्या उमेदवारांना माघार घ्यावी यासाठी गावातील नेतेमंडळी आपला गट सांभाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. यात दोघाचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी फटफजिती होऊ नये यासाठी नेत्यांकडून मांडवली सुरु आहे. 

काहींना आता माघार घ्या, पुढे कुठेतरी संधी देतो, अमुक करतो, तमुक करतो असेही सांगण्यात येत आहे. असे चित्र अनेक गावागावातील प्रत्येक वॉर्डात सुरु आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांने माघार घ्यावी यासाठी नेत्यांचे शिलेदार संबधित उमेदवारांचे उंबरे झिजवत आहेत. एखादा उमेदवार माघारीसाठी कोणाचे ऐकतो याचाही शोध घेवून आपल्या निवडणुकीतील आडसर दूर करण्याचा इच्छुकांचा प्रयत्न सुरु आहे .

प्रसंगी साम, दाम, दंड, भेद याबाबतची व्यूहरचना केली जात आहे. तरीसुद्धा अनेक वॉर्डातील उमेदवार कोणत्याही आमीषाला बळी न पड़ता निवडणुकीला सामोरे जाणार या इराद्याने पेटून उठले आहेत असे अनेक गावागावातील सर्वच वॉर्डातील चित्र आहे.

प्रसंगी दबाव, पैशाचे आमिष आणि ..
इच्छुकांची यादी वाढल्यामुळे आपल्याच गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेमंडळी कडून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतदानात घट येण्यासाठी विविध कुरघोडया सुरु केल्या आहेत. त्याच बरोबर उमेदवारी अर्ज माघारी घे म्हणण्यासाठी गल्ली अथवा वॉर्डातील जाणकार नेतेमंडळीची वर्दळ उमेदवारांच्या घराकडे वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून रात्री उशिरापर्यत चर्चा झडू लागल्या आहेत. अर्ज माघारी साठी सर्वाकडूनच अनेक इच्छुकावर दबाव दहशत तसेच पैशाचे आमिष दाखविण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्या वॉर्डातुन कोण माघार घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

पेडमध्ये सर्वाधिक अर्ज 
तासगाव तालुक्यातील पेड येथे अंत्यत चुरशीने निवडणूक होत आहे . ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी तब्बल ६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारी नंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. तरीसुद्धा पेडमध्ये काट्याची लढत होणार आहे. पेडच्या इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गावात दोन्ही गटात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अर्ज कुणाला माघारी काढून घे असे म्हणायचे असा यक्ष प्रश्न स्थानिक नेत्यांसमोर पडला आहे. गावामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या मनस्थितीत कोणीही नाही. त्यामुळे सोमवारी दि. ४ रोजीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे जे मात्र निश्चित!.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख