राजकीय साठमारीत पंढरपुरातील कोविड रूग्णालयाचा प्रश्न लटकला

संकटाच्या काळात राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आरोग्य सेवा निर्माण करण्यास विरोध करणे म्हणजे समाजाशी आणि सामाजिक बांधिलकेशी प्रतारणा करण्या सारखेच आहे .कोविड रूग्णालय सुरू करण्यावरून पंढरपुरात सध्या सुरू असलेल्या राजकीय धुळवडीमध्ये सर्वसामान्य रूग्णांची मात्र हेळसांड सुरू आहे.
Pandharpur Covid Hospital Proposal Pending due to Politics
Pandharpur Covid Hospital Proposal Pending due to Politics

पंढरपूर : सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू  लागला आहे. शासकीय हाॅस्पीटलआणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडते की काय अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कोविड-१९ रूग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर कोविड रूग्णालयाचा प्रश्न अजून ही लटकला आहे. दरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बोटचेपे धोरण असल्याने या बाबतचा गुंता अधिकच वाढला आहे.

संकटाच्या काळात राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आरोग्य सेवा निर्माण करण्यास विरोध करणे म्हणजे  समाजाशी  आणि सामाजिक बांधिलकेशी प्रतारणा करण्या सारखेच आहे .कोविड रूग्णालय सुरू करण्यावरून पंढरपुरात सध्या सुरू असलेल्या राजकीय धुळवडीमध्ये सर्वसामान्य रूग्णांची मात्र हेळसांड सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येचा विचार करून पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयाला  कोविड- १९ रूग्णालयाचा दर्जा देऊन येथेच उपचार सुरू करण्याचा विचार सुरू होता. त्यावेळी पंढरपूरचे राष्ट्रवादीचे  आमदार भारत भालके यांनी सुरवातीला विरोध दर्शवला होता. त्यावेळी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवण्याचे धोरण स्विकारून या मुद्द्याकडे गांभीर्याने न पाहाता दुर्लक्ष केले. 

कोरोना आल्यावर यंत्रणा झाली जागी

सोलापूर शहरातील कोरोना जेव्हा पंढरपूर जवळ असलेल्या उपरी गावात आला, तेव्हा निर्धास्त असलेली यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर  येथील कोविड रूग्णालयाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्याच दरम्यान येथील जनकल्याण रूग्णालायात कोरोना बाधित रूग्णाला  उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यावेळी  येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील रूग्णालयात कोरोना बाधीत रूग्णावर उपचार करण्यास तीव्र विरोध केला होता. त्यानंतर प्रशासनाने संबंधित रूग्ण सोलापूरला पाठवला.

आमदार भालकेंचा यू-टर्न

त्यावेळीही  येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेतली होती. अधिकार्यांच्या या भूमिकेची अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दोन दिवसापूर्वी  पुन्हा आमदार भारत भालके यांनी यू - टर्न घेत उपजिल्हा रुग्णालयाला कोविड १९ दर्जा देण्याची मागणी केली आहे. भालकेंची ही मागणी समाज माध्यमांमध्ये येताच येथील  विक्रम शिरसट आणि अक्षय गंगेकर या दोन नगरसेवकांनी येथील उपजिल्हा रूग्णालायात कोविड ग्रस्तांवर उपचार करण्यास विरोध केला आहे. 

पंढरपूरच्या रहिवाशांच्या जीवाशी खेळ

विरोध करण्यासाठी या भागातील शेकडो लोक संचार बंदीचा आदेश पायदळी तुडवून एकत्र जमा झाले होते. त्यानंतर ही प्रशासनाने कोणतीच कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. कोरोनाच्या या गंभीर प्रश्नावरून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी उठ सूठ कोणीही विरोध करेल आणि प्रशासान त्याकडे पाहात बसणार असेल तर पंढरपूरकरांसाठी हे धोक्याचे ठरणारे आहे. एकंदरीतच अशा गंभीर परिस्थितीत शासनाकडून आलेले आदेश आणि लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन कायद्याचा आधार घेत समन्वय राखणे गरजेचे आहे.
 
येथील उपजिल्हाधिकारी सचिन ढोले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून केवळ दिखाव्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीच मागणी पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com