No Entry to MLA's and MP's in Pandharpur Tomorrow | Sarkarnama

आमदार खासदारांना उद्या पंढरपुरात 'नो एंट्री'?

भारत नागणे
मंगळवार, 30 जून 2020

यात्रे दरम्यान शहरात कोरोनाच संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्याच बरोबर पुढचे दोन दिवसासाठी पंढरपुरात आमदार,खासदारांबरोबरच कोणत्याही लोकसेवकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी यात्रा रद्द कऱण्यात आली आहे. तरीही प्रतिकात्मक पध्दतीने आषाढी एकादशीचा सोहळा उद्या (ता.१) साजरा होत आहे. यात्रे दरम्यान शहरात कोरोनाच संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्याच बरोबर पुढचे दोन दिवसासाठी पंढरपुरात आमदार,खासदारांबरोबरच कोणत्याही लोकसेवकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच पंढरपूर शहरात ही दोन दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. शहरात ऐन यात्रा काळात  सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये येथील एका सहकारी बॅंकेच्या पाच संचालकांसह येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चालकाचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच आषाढी पायी पालखी सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे सातही मानाच्या संतांच्या पालख्या आज एसटी बसने पंढरपुरात आणण्यात येणार आहेत. आज सायंकाळी संत ज्ञानेश्वर, संत तुकराम महाराजांच्या प्रमुख पालख्यासंह इतर नऊ मानाच्या पालख्या वाखरी येथे येणार आहेत. त्यानंतर संत भेट होणार आहे. संत भेटीसाठी  संत निळोबा  आणि संत  नामदेव महाराची पालखी  ही वाखरीला एसटीबसने नेण्यात येणार आहे. याची सर्व तयारी प्रशासनाने केली आहे.

त्रिस्तरीय तपासणी

वारी काळात बाहेर गावाहून कोणीही भाविक किंवा वारकरी पंढरपुरात येवू नयेत यासाठी पंढरपूरच्या सर्व मार्गावर चेक नाके तयार केले आहेत. सर्व नाक्यावर पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. आता पर्यंत अन्य जिल्ह्यातून आलेल्या सुमारे १३८ भाविकांना परत पाठवण्यात आले आहे. त्रिस्तरीय चेक नाक्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक व  वारकऱ्यांना प्रवेश मिळणआर नाही.

मोजक्या व्यक्तींनाच मंदीरात प्रवेश

बुधवारी (ता.१) आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. महापूजेसाठी काही मोजकेच पुजारी आणि अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पूजेसाठी राज्यातील काही आमदार, खासदार आणि लोकसेवक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यत असते. त्यामुळे यावर्षी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पंढरपुरात येवू नये असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी केले आहे.

आज दुपार पासून पंढरपुरात संचार बंदी 
आषाढा यात्रेच्या निमित्ताने शहरात गर्दी होवूनये यासाठी आज दुपारी दोन वाजले पासून संचार बंदी लागू कऱण्यात आली आहे. ३ जुलैच्या सकाळी पाच वाजेपर्यंत ही संचार बंदी असणार आहे.संचारबंदी काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन य़ेथील प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्या सोबत पूजा कऱण्याचा मान विणेकऱ्याला 
उद्या पहाटे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून यंदा विठ्ठल मंदिरात विणेकऱ्याची सेवा करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील  विठ्ठल ज्ञानेश्वर बडे यांना मिळाला आहे. बडे यांचे वय 84 वर्षे  आहे. ते गेल्या सहा वर्षापासून विठ्ठल मंदिरात विणा वाजवून पहारा देतात. एकूण सहा विणेकऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यातून विठ्ठल बडे यांना मुख्यमंत्र्यां सोबत महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख