सातारा जिल्ह्यात झेंडा राष्ट्रवादीचाच; पण भाजप- सेनेचीही मुसंडी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक गटांचे वर्चस्व दिसत असले, तरी भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही मुसंडी मारत पाटण, कोरेगाव, वाई, सातारा तालुक्‍यांत यश मिळविले आहे, तर खटाव, वाई, कऱ्हाड दक्षिणेपुरती कॉंग्रेस सीमित राहिली आहे.
Udayanraje - Balasaheb Patil - Shivendraraje-Shambhuraj Desai
Udayanraje - Balasaheb Patil - Shivendraraje-Shambhuraj Desai

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक गटांचे वर्चस्व दिसत असले, तरी भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही मुसंडी मारत पाटण, कोरेगाव, वाई, सातारा तालुक्‍यांत यश मिळविले आहे, तर खटाव, वाई, कऱ्हाड दक्षिणेपुरती कॉंग्रेस सीमित राहिली आहे.

कोरेगावात आमदार महेश शिंदेंनी स्थानिक पातळीवर पाय घट्ट रोवले असून, माण तालुक्‍यात भाजप आमदारांची पकड कमी होऊन राष्ट्रवादीची ताकद वाढू लागल्याचे दिसते. जावळीत शिवेंद्रसिंहराजेंनी आपली जादू कायम ठेवली असून, फलटणला राजे गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. वाई मतदारसंघात मकरंद पाटलांच्या गटाने सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. पाटण तालुक्‍यात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या गटाने आघाडी घेतली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळेस भाजपला स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला टाकण्यात आला होता; पण महाविकास आघाडीतील सर्वांनीच आपापल्या स्थानिक गटाची सत्ता ग्रामपंचायतीत यावी यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमख प्रा. नितीन बानुगडे- पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच स्थानिक आमदारांनी लक्ष घातले होते. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकांत अनेक नेत्यांच्या हातातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती सुटल्या. सातारा तालुक्‍यात काही ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह शशिकांत शिंदे, पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या गटांच्या एकत्रित पॅनेलने ग्रामपंचायतीत वर्चस्व राखले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजेंच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गटाचीच सत्ता आली आहे. राष्ट्रवादीनेही जावळीत काही ग्रामपंचायतींत वर्चस्व राखले आहे. मात्र, खासदार उदयनराजे गटाच्या हातून महत्त्वाच्या ग्रामपंचायती निसटल्या आहेत.

कोरेगावात आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीत असले, तरीही त्यांच्या स्थानिक गटांतील चुरशीच्या लढतींत अनेक मोठ्या गावांत आमदार महेश शिंदेंनी बाजी मारलेली दिसते. ल्हासुर्णे ग्रामपंचायत तिसऱ्यांदा शशिकांत शिंदे यांच्या गटाच्या हाताला लागली नाही. वाई मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांच्या स्थानिक गटाची सत्ता बहुतांश ग्रामपंचायतीवर आली असून, त्यांनी वाईचा किल्ला अबाधित राखला आहे. महाबळेश्‍वर व खंडाळा तालुक्‍यांतही त्यांच्याच गटाचे वर्चस्व राहिले आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या स्थानिक गटांची सत्ता बहुतांश ग्रामपंचायतींवर आली असली, तरी त्यांना बनवडी व पालमध्ये धक्का बसला आहे. 

पालमध्ये माजी सभापती देवराज पाटील यांना सत्ता गमवावी लागली आहे. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण व भाजपचे अतुल भोसले यांच्या गटात चुरशीच्या लढती होऊन भाजपने सत्ता कायम राखली आहे. काही ठिकाणी बाबा- काका गटात, तर काही ठिकाणी अतुल भोसले व पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात एकत्र लढती झाल्या. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणेत संमिश्र कौल मिळाला आहे. पाटण मतदारसंघात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवत राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकरांना धक्का दिला आहे. शंभूराज देसाई यांची ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ताकद वाढली आहे. फलटण मतदारसंघात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व जिल्हा परिषदेच माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे.

माण तालुक्‍यात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्यास सुरवात केली आहे. महत्त्वाच्या ग्रामपंचातींमध्ये गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड, पिंगळी, वरकुटे म्हसवड, देवापूर या राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत, तर शिंगणापूर, कुळकजाई, राणंद ग्रामपंचायती भाजपकडे गेल्या आहेत. मात्र, आमदार जयकुमार गोरे यांची ग्रामपंचायतींवरील पकड कमी होऊ लागल्याचे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या गावात सत्ता कायम राखली आहे. खटाव तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची पक्कड कायम असून, पुसेगाव, कलेढोण, एनकूळमध्ये परिवर्तन झाले आहे. पुसेसावळी, निमसोडमध्ये स्थानिक गटाची सत्ता कायम राहिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com