राष्ट्रवादीचे अनेक नेते धनंजय मुंडेंसारखे : भाजप खासदाराचे धक्कादायक विधान 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही.
Many NCP leaders like Dhananjay Munde : Shocking statement of BJP MP
Many NCP leaders like Dhananjay Munde : Shocking statement of BJP MP

करमाळा (जि. सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नामधारी मुख्यमंत्री असून त्यांचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. कारण, ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर राज्याचा कारभार करतात. या सरकारच्या खुर्चीला तीनच पाय असल्यामुळे सरकारचा कारभार अनागोंदीचा आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. 

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात खासदार नाईक निंबाळकर हे सोमवारी (ता. 15) पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून राज्यातील आठ कोटी शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत. विधानसभेत वीज तोडणार नाही अशी घोषणा करायची आणि नंतर लगेचच अधिवेशन संपताच वीजतोडणी सुरू करायची, हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार आहे. लॉकडाउनच्या काळात शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. शेतीमाल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. लॉकडाउनच्या काळातील वीजबिल वसुली केली जात आहे. आज गावच्या गावे अंधारात आहेत, तरी या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांबद्दल दयामाया येत नाही. 

माजी वनमंत्री संजय राठोड यांना एक न्याय आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एक न्याय या बाबत बोलताना खासदार निंबाळकर यांनी धक्कादायक विधान केले. ते म्हणाले, "राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा असल्यामुळे हे सगळे घडत आहेत. धनंजय मुंडेंवर या प्रकरणात कारवाई केली, तर राष्ट्रवादीच्या अनेक नेतेमंडळींची अशी प्रकरणे आहेत. त्या नेत्यांना राजीनामा द्यावा लागेल.'' 

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष लढवणार असून वेळप्रसंगी समविचारी लोकांना आम्ही बरोबर घेणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्याला अधोगतीला नेत असून लवकरच महाराष्ट्रात सत्ता बदल होईल, असा विश्वास खासदार निंबाळकर व्यक्त केला. 

उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाकताना राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सरचिटणीस अमरजित साळुंखे, काका सरडे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com