सोलापूरात एमआयएम संपणार की वाढणार?

नांदेडमधील एमआयएमला जसे फुटाफुटीमुळे ग्रहण झाले त्याच वाटेवर आज सोलापूरची एमआयएम आहे. सोलापुरातील एमआयएमची धुरा वेळीच फारुख शाब्दी यांच्याकडे आली, त्यामुळे त्यांना संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुरेसा अवधी हातात आहे. या संधीचे शाब्दी कसे सोने करतात? याचे उत्तर २०२२ च्या सोलापूर महापालिका निवडणुकीतूनच मिळणार आहे.
Asaduddin Owaisi - Faroqe Shabdi
Asaduddin Owaisi - Faroqe Shabdi

सोलापूर : नांदेडमध्ये एमआयएमची एका नगरसेवकापासून सुरुवात झाली. नंतरच्या निवडणुकीत ११ तर त्या पुढच्या महापालिका निवडणुकीत शून्य नगरसेवक निवडून आले. एमआयएमला हे ग्रहण लागले ते फुटाफुटीमुळे. आज सोलापूरची एमआयएमही याच वाटेकडे निघाली आहे का, असा प्रश्न सुरु असलेल्या घडामोडींवरुन पडतो आहे. २०२२ ची महापालिका निवडणूक एमआयएमचे सोलापूरमधील भवितव्य काय हे ठरवणार आहे. 

कै. बाळासाहेब ठाकरे यांनीही नांदेडमधील एमआयएमची (ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहाद्दुल मुसलमिन) पक्षाची दखल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात घेतली होती. २००७ नंतर झालेल्या नांदेड महापलिकेच्या पोटनिवडणूकीतून एमआयएमला पहिली जागा मिळाली. त्यानंतर २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड महापालिकेत एमआयएमचे ११ नगरसेवक विजयी झाले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत नांदेडमध्ये एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. सोलापूरच्या एमआयएमला नांदेडमधून प्रेरणा मिळाली. आता सोलापुरातील एमआयएमचे नगरसेवक नांदेडच्या वाटेवर निघाले आहेत.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यातील एक-एक महापालिका कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या हातातून जात होत्या. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र किमया केली आणि कॉंग्रेसच्या हातातच नांदेडची महापालिका ठेवली. एकहाती सत्ता मिळविताना त्यांनी नांदेडमधील एमआयएमचा सुफडा साफ केला. नांदेडमधील एमआयएमच्या ११ नगरसेवकांना त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला. त्यापैकी ८ जणांना कॉंग्रेसचे तिकिट मिळाले आणि त्यातील ६ जण २०१७ मध्ये कॉंग्रेसकडून नगरसेवकही झाले. 

सध्या नांदेडची एमआयएम बकाल झाली आहे. एमआयएमचे प्रमुख खासदार असुद्दोद्दिन ओवेसी आणि आमदार अकबरुद्दिन ओवेसी फक्त निवडणुकांपुरतेच येऊ लागले आहेत.नांदेडची प्रेरणा घेत सोलापूरच्या एमआयएमनेही तशीच वाटचाल केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने तौफिक शेख यांच्या रुपाने शहर मध्यमधून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. २०१७ च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमचे ९ नगरसेवक विजयी झाले. त्यातील ६ ते ७ नगरसेवक आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतु पक्ष प्रवेशाचा मुहूर्त मात्र अद्यापही ठरलेला नाही. 

नांदेडमधील एमआयएमला जसे फुटाफुटीमुळे ग्रहण झाले त्याच वाटेवर आज सोलापूरची एमआयएम आहे. सोलापुरातील एमआयएमची धुरा वेळीच फारुख शाब्दी यांच्याकडे आली, त्यामुळे त्यांना संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुरेसा अवधी हातात आहे. या संधीचे शाब्दी कसे सोने करतात? याचे उत्तर २०२२ च्या सोलापूर महापालिका निवडणुकीतूनच मिळणार आहे. एमआयएममधून राष्ट्रवादीतून जाणाऱ्या नगरसेवकांना पर्याय शोधण्यासाठी शाब्दी यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. राजकारणासाठी आवश्‍यक असलेली साम, दाम, दंड आणि भेद वापरण्याची तयारी आणि क्षमता शाब्दी यांच्याकडे असल्याने एमआयएमचे नांदेडात जे झाले ते सोलापुरात होण्याची शक्‍यता कमी आहे.

एमआयएमचा फायदा भाजपलाच

ज्या ज्या शहरात एमआयएमचा मोठा विस्तार झाला त्या त्या ठिकाणच्या भाजप नेत्यांनी एमआयएमला सर्वतोपरी मदत केल्याचे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे. एमआयएमचा सर्वाधिक फायदा भाजपला होत असल्याचे दिसत आहे. भाजपची बी टीम म्हणूनही एमआयएमवर सातत्याने टिका होत आहे. ओवेसी बंधू फक्त निवडणूक असेल तरच महाराष्ट्रात येतात असा अनुभव नांदेडचा आणि आता सोलापूरचाही आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या सोलापूर महापालिका निवडणूकीच्या तोंडावर एमआयएम आणि राष्ट्रवादीतील घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com