वाळू तस्करांचा नायब तहसीलदार, तलाठ्यावर चाकूने हल्ला   - Deputy Tehsildar & Talatha attacked by sand smugglers | Politics Marathi News - Sarkarnama

वाळू तस्करांचा नायब तहसीलदार, तलाठ्यावर चाकूने हल्ला  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 जानेवारी 2021

जिल्ह्यातील प्रशासनाचे वाळूमाफियांना अभय असल्यानेच व प्रशासनात दलालांची ढवळाढवळ वाढल्याने वाळूमाफियांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे.

यवतमाळ : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यास गेलेले उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर शनिवारी (ता. २२) रात्री 11 च्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रोडवर वाळूतस्करांकडून चाकूहल्ला करण्यात आला. यामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खडबळ उडाली आहे.

येथील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पोटावर चाकूने वार केल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तत्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारकरिता त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. 

या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली आहे. त्यांनी संशयित आरोपी अविनाश चव्हाण व त्याच्या इतर साथीदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले आहे.

तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती चांगली असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाळूमाफियांना अभय कुणाचे?

जिल्ह्यातील वाळूघाटांचे अद्याप लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळूची तस्करी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असताना वाळूघाटांचे लिलाव का केले जात नाही, हे एक कोडेच आहे. जिल्ह्यातील प्रशासनाचे वाळूमाफियांना अभय असल्यानेच व प्रशासनात दलालांची ढवळाढवळ वाढल्याने वाळूमाफियांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. याकडे शासनाने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख