Corona to a senior officer in Solapur | Sarkarnama

मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सोलापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोना 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 29 जून 2020

सोलापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता. 28 जून) आहे. हे अधिकारी सोलापुरात नुकतेच झालेल्या तीन मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता. 28 जून) समोर आले आहे. हे अधिकारी सोलापुरात नुकतेच झालेल्या तीन मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. 

सोलापूर शहर आणि जिल्ह्याची चिंता वाढविणाऱ्या कोरोनाने आता जिल्हा प्रशासनाची, राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचीही चिंता वाढविली आहे. सोलापूर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे रविवारी (ता. 28 जून) समोर आले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. 27 जून) कोरोनासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला या वरिष्ठ अधिकाऱ्याने हजेरी लावल्याने सोलापुरातील कोरोनाची चिंता आता जिल्हा प्रशासनासह राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंतही जाऊन पोचली आहे. 

महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याने रविवारी रात्री समोर आल्यानंतर सोमवारी (ता. 29 जून) दिवसभर सोलापूर शहर व जिल्हा प्रशासनात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. कोरोनाबाधित आलेले महापालिकेचे ते अधिकारी आणखी कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत. याचा शोध घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. 

या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह उपस्थित होते. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना महामारी नियंत्रणात आणणारी प्रशासकीय यंत्रणाच सध्या कोरोना विषाणूच्या धास्तीत सापडली आहे. 

पिंपरीत दोन पोलिस निरीक्षकांना कोरोना 

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा कोरोना अहवाल आज (ता. 29 जून) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपरी पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोना विषाणूने सुमारे महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 

आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा अहवाल सोमवारी (29 जून) पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आतापर्यंत सतरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील चौदा जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेले बहुतांश पोलिस संपूर्ण उपचारानंतर ड्यूटीवर हजर झाले आहेत. आयुक्तालयातील चार पोलिसांवर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख