कागल : सत्ता नसतानाही भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात १३७ तर कागल तालुक्यात १०३ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. तालुक्यात २४ ठिकाणी तर कडगाव कौलगे उत्तूर मतदारसंघात सहा अशा ३० ठिकाणी भाजप सत्तेत राहणार असल्याचा दावा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केला. वेळी वीरेंद्रसिंह घाटगे उपस्थित होते.
श्री घाटगे म्हणाले, "कागल तालुक्यासह कडगाव-कौलगे, उत्तर जिल्हा परिषदेचा विचार करता लढविलेल्या ३३० जागांपैकी १३७ हुन अधिक जागांर उमेदवार निवडून आले आहेत. तालुक्यात ५३ ग्रामपंचायतीत २६५ उमेदवार उभे केले. त्यामध्ये १०३ सदस्य निवडून आले. कडगाव-कौलगे, उतूर गटातून ३४ उमेदवार विजयी झाले आहेत. गतवेळच्या तुलनेत जिंकलेल्या सदस्य संख्येत ३२ जागांची वाढ झाली आहे. तसेच झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. यावरून तळागाळापर्यंत भाजपकडे वाढता कल असल्याचे स्पष्ट होते.''
ते म्हणाले, "गोकुळ'चे संचालक रणजितसिंह पाटील (मुरगूड), 'बिद्री'चे विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील, कागल तालुक्यासह कडगाव -कौलगे, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या कष्टाचेच हे फळ आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर न लढवता सर्वच गटांनी स्थानिक परिस्थितीनुसार सोयीच्या आघाड्यांमार्फत लढविली. राज्याची आकडेवारी पहिली तर भाजपाला एक नंबरच्या जागा मिळालेल्या आहेत.''
हे त्यांचे अपयश
श्री. घाटगे म्हणाले, आपल्या गटाला किती जागा मिळाल्या हे त्या त्या गटाच्या प्रमुखाने सांगणे समजू शकतो; पण आम्हाला मिळालेल्या जागा कोणीतरी दुसरेच जाहीर करते. हेच त्यांचे अपयश आहे. हा तर अजब प्रकार आहे, अशी मिश्किल टिपणीही श्री घाटगे यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.
Edited By - Amit Golwalkar

