भाजप सदस्य आक्रमक ; चंद्रकांत पाटलांना म्हणाले ''अभी नहीं, तो कभी नहीं''  - BJP member Aggressive Chandrakant Patil said | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप सदस्य आक्रमक ; चंद्रकांत पाटलांना म्हणाले ''अभी नहीं, तो कभी नहीं'' 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना पुरेसा वेळ मिळाला आहे. आता नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे.

सांगली : सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना पुरेसा वेळ मिळाला आहे. आता नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या मतदार संघाचे आरक्षण फिरते असते. आम्हाला पुन्हा येथे संधी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने "अभी नहीं, तो कभी नहीं', असे असते. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, बदल करावा, अशी आग्रही मागणी आज भाजपच्या सदस्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वसंत बंगला येथे ही बैठक झाली. चंद्रकांत पाटील यांनी आधी भाजपच्या कोअर समितीसोबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना वेळ दिला. त्यात माजी सभापती अरुण राजमाने, ज्येष्ठ सदस्य डी. के. पाटील, संपतराव देशमुख, अरुण बालटे, सरदार पाटील, सरिता कोरबू, अश्‍विनी पाटील, ऍड. शांता कनुंजे, सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले यांच्यासह सभापती प्रमोद शेंडगे, स्नेहलता जाधव, मंगल नादम, शोभाताई कांबळे आदींचा समावेश होता. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील आज अर्थसंकल्पाबाबत भूमिका मांडण्यासाठी आले होते. त्या दौऱ्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेतील घडामोडींचा आढावा त्यांनी घेतला. त्यांनी आधी प्रमुख नेत्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद सदस्यांना वेळ दिला. सध्याच्या कारभाराची माहिती घेतली आणि मग बदलासाठी आग्रही सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ज्येष्ठ सदस्य संतपराव देशमुख यांनी आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले, "जे ठरले आहे तसे झाले पाहिजे. सर्वांना संधी मिळाली पाहिजे. निवडणूक एक वर्षावर आली आहे. पुन्हा सत्ता यायची असेल तर बदल करावाच लागेल.''

काही सदस्यांनी बदल करताना काही उलटे सुलटे होणार नाही, महाविकास आघाडीचा प्रयोग येथे होईल याची भीती बाळगू नये, असा विश्‍वास देण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी बदलासाठीचे निवेदन स्वीकारले. याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, महापालिकेत महापौर निवडीचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊ, अशी ग्वाही दिली. विद्यमान अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. कोरोना काळातील अडचणी, प्रशासन आणि राजकारण या पातळीवर सुरू असलेली कसरत या विषयावर त्यांनी मते मांडली.

मी जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना समजून घेतल्या. देवेंद्रजी आणि माझे ठरले आहे, की आधी भावना समजून घेऊ. त्यानंतर निर्णय घेऊ. आता महापौर निवड झाल्यानंतर पुन्हा या विषयासाठी मी वेळ देणार आहे. त्याबाबत तेव्हाच निर्णय घेता येईल, असे पाटील यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख