निवडणुकीत पॅनेलचा खर्च करायचा कुणी? गावपुढारी साशंक - who will spend on Panel Expenses in Grampanchayat Elections | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीत पॅनेलचा खर्च करायचा कुणी? गावपुढारी साशंक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

सरपंच पदाचे अद्यापही आरक्षण जाहीर झालेले नसून निवडणूक झाल्यानंतर हे आरक्षण जाहीर होणार आहे. सरपंचपदाची 'लॉटरी' गुलदस्त्यात असल्याने निवडणुकीच्या पॅनेलचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्‍न गावपुढाऱ्यांसमोर ठाकला आहे

राजापूर :  कोरोनाच्या महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. मात्र, सरपंच पदाचे अद्यापही आरक्षण जाहीर झालेले नसून निवडणूक झाल्यानंतर हे आरक्षण जाहीर होणार आहे. सरपंचपदाची 'लॉटरी' गुलदस्त्यात असल्याने निवडणुकीच्या पॅनेलचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्‍न गावपुढाऱ्यांसमोर ठाकला आहे.

यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत होते. त्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार सरपंचपदावर डोळा ठेवून पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या खर्चाचा भार उचलत असत. खर्चाचा भार उचलणाऱ्या उमेदवाराला पॅनेल निवडून आल्यानंतर आपसूकच सरपंचपदाचा बहुमान मिळत असे. सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारामुळे पॅनेलमधील अन्य उमेदवारांच्या खर्चाचा भारही हलका होत असे. या वेळी मात्र त्याच्या उलटे चित्र आहे. 

निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरवात झाली असली तरी अद्यापही सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर म्हणजे १५ जानेवारीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकण्यास इच्छुक असलेल्यांच्या गोटामध्ये 'थोडी खुशी, थोडा गम' अशी काहीशी स्थिती आहे. त्याचा काही अंशी फटका ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकणाऱ्या एका पक्षाची विचारधारा असलेल्या उमेदवारांच्या पॅनेलला बसण्याची शक्‍यता आहे.

खर्चाची मर्यादा
ग्रामपंचायत सदस्य संख्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निवडणूक विभागाने घालून दिली आहे. सात ते नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायत उमेदवार, २५ हजार, ११ ते १३ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायत उमेदवारासह ३५ हजार, पंधरा ते सतरा सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायत उमेदवारांना ५० हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक विभागाने घालून दिली आहे.

उमेदवाराच्या खांद्यावर भार..
सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या खांद्यावर गावपुढारी अनेकवेळा पॅनेलच्या खर्चाचा भार टाकतात. मात्र, आरक्षणामुळे इच्छुक उमेदवार सद्यःस्थितीमध्ये तळ्यात-मळ्यात आहेत. अशा स्थितीमध्ये पॅनेलचा खर्च कोण करणार, असा प्रश्‍न अनेक पॅनेलसह गावपुढाऱ्यांपुढे आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख