पोटासाठी दारू विकली तर काय झाले? भास्कर जाधवांचे वादग्रस्त वक्तव्य - Sena MLA Bhaskar Jadhav Shocking Statement about Illicit Liquor | Politics Marathi News - Sarkarnama

पोटासाठी दारू विकली तर काय झाले? भास्कर जाधवांचे वादग्रस्त वक्तव्य

मुझफ्फर खान 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले. पोलिस हप्ते घेत नाहीत का? असे वादग्रस्त वक्तव्य गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर येथे काढले. केवळ चोरी आणि मुलींंची छेडछाड या विषयासाठी मला फोन करू नका, अशी तंबीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

चिपळूण : पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले. पोलिस हप्ते घेत नाहीत का? असे वादग्रस्त वक्तव्य गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर येथे काढले. केवळ चोरी आणि मुलींंची छेडछाड या विषयासाठी मला फोन करू नका, अशी तंबीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

गुहागर येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. सोशल मिडीयावर ते चांगलेच व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळातही त्याची जोरदार चर्चा आहे. आमदार जाधव महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचे मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. 

चिपळूण, दापोली, खेड, मंडणगडसह त्यांनी गुहागरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. उत्तर रत्नागिरीत युवा सेनेच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर टिका केली. युती असूनही गुहागरमध्ये भाजपने त्यांना कसा दगा दिला त्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. तसेच अवैधरित्या होणार्‍या दारू विक्रीचे समर्थनच केले. 

लॉकडाउनच्या काळात दारूविक्री करणार्‍या शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याचा संदर्भ देत आमदार जाधव म्हणाले, ''पोटापाण्यासाठी कुणी दारू विकली तर काय झाले. पोलिस हप्ते घेत नाहीत का ? चोरी आणि मुलींची छेडछाड या दोन गोष्टींसाठी मला कोेणी फोन करू नका. बाकी रात्री - अपरात्री कधीही कोणत्याही कामासाठी मला फोन करा मी धावत येईन,'' अवैधरित्या होणार्‍या दारू विक्रीचे त्यांनी एका प्रकारे समर्थनच केले. त्यामुळे जाधवांच्या या वादग्रस्त वक्तव्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख