संग्राम देशमुखांनी घेतली महादेवराव महाडिकांची भेट  - Sangram Deshmukh had meeting with Mahadevrao Mahadik at Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

संग्राम देशमुखांनी घेतली महादेवराव महाडिकांची भेट 

सुनील पाटील
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्षाचे पदवीधर निवडणुकीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन पदवीधर निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. 

कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाचे पदवीधर निवडणुकीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन पदवीधर निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. 

पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी नेत्यांच्या गाठी-भेटीला सुरवात केली आहे. भाजपने सांगलीच्या संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली. काल त्यांनी येलूर येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. भेटीबाबत महादेवराव महाडिकांना विचारले असता ते म्हणाले, "आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते निवडणूक रिंगणात आहेत. अजून मी निवडणुकीत काही लक्ष घातलेले नाही. योग्य वेळ आली की काय करायचे ते पाहू.'' मात्र ही भेट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झाली असून, देशमुख यांनी महाडिक यांना सहकार्य करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, आज देशमुख कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. ते जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगाव येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ते कोल्हापुरात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.  जिल्ह्याची पदवीधर मतदारनोंदणी सर्वाधिक आहे, मात्र भाजपचा एकही आमदार अथवा खासदार जिल्ह्यात नाही. त्यामुळे मतदारांशी संपर्क करणे, मतदानादिवशी त्यांना मतदान करण्यासाठी बोलवणे, ही सर्व कामे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाच करावी लागणार आहेत. त्यामुळे देशमुख यांना या सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणे क्रमप्राप्त आहे. 

चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठापणाला 
पुणे पदवीधरसंघातून दोन वेळा चंद्रकांत पाटील निवडून आले. दोन्ही वेळा कोल्हापुरातील मतदारांनी त्यांना साथ दिली. या निवडणुकीतही जिल्ह्यातून सर्वाधिक मतदारनोंदणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून भाजपला अधिक मतदान होण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर असल्याने निवडणूक दादांसाठी प्रतिष्ठेची आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख