कैद्याच्या घरी मटण पार्टी; पोलिसांच्या गळ्यात फसली हड्डी! - Police Made Party with Corona Positive Jail Inmates Home | Politics Marathi News - Sarkarnama

कैद्याच्या घरी मटण पार्टी; पोलिसांच्या गळ्यात फसली हड्डी!

भारत नागणे
गुरुवार, 23 जुलै 2020

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील एका कुटुंबाच्या घरी शुक्रवारी  बोकडाच्या जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कुटुंबाशी संबंधित एक व्यक्ती सध्या खुनाच्या प्रकरणात सध्या मंगळवेढा येथील सब जेल  मध्ये आहे. बोकडाच्या जेवणासाठी आंबे येथे जाण्याचा प्लॅन त्या कैद्याने केला. पोलिसाला ही बोकडाच्या जेवणाचा मोह आवरला नाही

पंढरपूर : बोकडाच्या जेवणासाठी खुनाच्या आरोपातील कैदी पोलिसांसह घरी येऊन जेवून गेला. दुसऱ्या दिवशी संबंधित कैद्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्यामुळे बोकडाच्या जेवणासाठी गेलेले  अनेकजण अस्वस्थ झाले असून जणू हड्डी गले मे फस गई.... अशी त्यांची अवस्था झाली आहे.

यापैकी अनेकांनी स्वतःहून घरात काॅरंटाईन करुन घेतले आहे. कोरोनामुळे उघड झालेल्या या प्रकाराची मंगळवेढा पोलीस चौकशी करत असून संबंधीत पोलिस आणि कैद्यावर लवकरच कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

बोकड, खुनातील आरोपी, पोलीस, गावकरी आणि करोना.... या धक्कादायक घटनेची समजलेली माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील एका कुटुंबाच्या घरी शुक्रवारी  बोकडाच्या जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कुटुंबाशी संबंधित एक व्यक्ती सध्या खुनाच्या प्रकरणात सध्या मंगळवेढा येथील सब जेल  मध्ये आहे. बोकडाच्या जेवणासाठी आंबे येथे जाण्याचा प्लॅन त्या कैद्याने केला. पोलिसाला ही बोकडाच्या जेवणाचा मोह आवरला नाही. संबंधित पोलीस त्या कैद्याला घेऊन खास गाडीने आंबे येथे आले होते. 

जेवणासाठी शंभरच्या आसपास लोकांनी उत्साहाने हजेरी लावली. उपस्थित मंडळी बोकड खाऊन तृप्त होऊन आपापल्या घरी गेली अन् दुसऱ्या दिवशी (शऩिवारी)  मंगळवेढा येथून जेवणासाठी आलेल्या कैद्याचा कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याची चर्चा सुरु झाली आणि या प्रकाराची चर्चा चव्हाट्यावर आली. 

मंगळवेढा वरून कैद्याला घेऊन पोलीस आंबे येथे कसे आले, याची चौकशी मंगळवेढा पोलिसांनी सुरू केली आहे. संबंधित कैद्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी म्हणून त्याला मंगळवेढा सब जेल मधून बाहेर काढल्याचा बहाणा करण्यात आला होता, अशी माहिती पुढे येत आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु बोकडाच्या जेवणासाठी  गेलेले गावकरी मात्र कोरोनाच्या भीतीने धास्तावले आहेत. और हड्डी गले मे फस गई अशीच अवस्था बोकडाच्या जेवणावर ताव मारलेल्या लोकांची झाली आहे.

या प्रकाराविषयी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांना विचारले असता ते म्हणाले या घटनेची माहिती मंगळवेढा पोलिसांना कळविण्यात आली असून मंगळवेढा पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.

मंगळवेढा येथील सबजेल मधून एका केद्याला घेऊन पोलिस कर्मचारी पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात मटन जेवण्यासाठी गेले होते. त्यानंतर कैदी आणि सब जेल मधील इतर कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. संबंध पोलिस आणि कैद्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आज संध्याकाळ पर्यंत कारवाई केली जाईल - अतुल झेंडे अप्पर पोलिस अधिक्षक ग्रामीण सोलापूर

Story Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख