पेड ग्रामपंचायतीसाठी आबा व काका गटात काट्याची लढत - Grampanchayat Election taking interesting turns in Sangli District | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

पेड ग्रामपंचायतीसाठी आबा व काका गटात काट्याची लढत

गजाजन पाटील
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

तासगाव तालुक्यातील पेड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ही जानेवारी महिन्यात होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव नेत्याकडून आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गावातील प्रभाग रचना, ग्रामपंचायत सदस्यांचा आरक्षण आदींचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाला आहे परंतु सरपंच पदाच्या सोडतीचा आरक्षण हे ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर ठरवले जाणार आहे

पेड (जि. सांगली)  : गेल्या पाच वर्षात कधी न विचारणारे, प्रभागातील विकास कामावर कधी न बोलणारे, साधा चहा तर सोडाच कधी कसं काय चालण्याची विचारणा न करणारे आणि गावात स्वतःच्या तोऱ्यात वावरणारे गावातील गावठी पुढारी आता मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवर्जून मतदारांची विचारपूस करीत असून आतापासूनच भाऊ, काका, दादा म्हणत नेत्यांनी मतदारांची जवळीक वाढवली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात हीच नेते मंडळी कुठे होती आता संतप्त सवाल पेड ( ता - तासगाव ) मधील लोकांनी केला आहे.

तासगाव तालुक्यातील पेड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ही जानेवारी महिन्यात होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव नेत्याकडून आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गावातील प्रभाग रचना, ग्रामपंचायत सदस्यांचा आरक्षण आदींचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाला आहे परंतु सरपंच पदाच्या सोडतीचा आरक्षण हे ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर ठरवले जाणार आहे.

पेड ग्रामपंचायत निवडणूक ही तिरंगी होणार का ? याकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे. तर काही प्रभागात अपक्ष ही लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र खरी लढत हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील व खासदार संजय काका पाटील गटात होणार आहे.

सध्या पेड ग्रामपंचायतीवर सध्या आर आर पाटील गटाची सत्ता आहे. सन 2015 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन 13 जागा पैकी सात जागावर आर आर पाटील गटाच्या तर सहा जागा या खासदार संजय पाटील गटाच्या निवडून आल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आबा व काका गटात सध्या मोठी धुसफूस सुरू आहे. उमेदवारी देण्यावरून बंडखोरी होणार हे जवळपास निश्चित आहे.

तर दुसरीकडे खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांत दोन गट पडले असून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांना शह देण्यासाठी खासदार गटाच्या जुन्या जेष्ठ लोकांनी एकत्रित येत मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांना त्यात यश मिळेना असे झाले आहे. मागील आठवड्यात दोन्ही गटांचे मनोमिलन करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले. मात्र त्यातही उमेदवारी देण्या वरून शह काटशह चे राजकारण सुरू आहे. त्यामुळे त्यांचे अद्यापही मनोमिलन झाले नाही. त्यामुळे ते सध्या सैरभैर धावू लागले आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षात खासदार गटाच्या काही ग्रामपंचायत सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांशी घरोबा केल्याने लोकांच्यात नाराजी व्यक्त होत आहे. याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

सध्या गावात गुप्त बैठकांना वेग आला आहे. त्याच बरोबर काही अपक्षही या निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी करू लागले आहेत. सरपंच पद हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अनुसूचित जातीच्या महिला साठी आरक्षित झालेले नाही. त्यामुळे यावेळी आरक्षण पडण्याची दाट शक्यता असल्याने प्रभाग क्रमांक पाचवर सर्वच राजकीय नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.
सध्या गावात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गाव नेते तसेच काही नाराज गट इतक्यादिनी आपापले स्वतंत्र पॅनेल उभा करून निवडणुका लढण्याचे नियोजन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या त्या प्रभागातील इच्छूक उमेदवार बघून आत्तापासूनच हालचाली चालू केल्या आहेत. त्यामुळे असे इच्छुक उमेदवार आतापासूनच भाऊ, काका, दादा म्हणत चहा पाण्याला सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पेड ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण आणि थंडीत चांगलेच तापू लागले आहे.

खासदार गटात फूट
मांजर्डे जिल्हा परिषद गटातून तिकीट देण्याच्या कारणावरून पेड मध्ये खासदार गटात मोठी फूट पडली आहे. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून खा. काकांनी तरुण पिढीला उमेदवारी दिल्याने जुन्या नेत्यांना ते पचले नाही. तेव्हापासून काका गटात उभी फूट पडली आहे. त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीत पडू लागले आहेत.

काका गटाचे ग्रा.प. सदस्य पाच वर्षे राष्ट्रवादी सोबत
2015 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर होऊन काका गटाकडून सत्ता आबा गटाकडे आली. तेव्हांपासून काका गटाच्या काही सदस्यांनी थेट आबा गटाशी संधान साधून सत्तेची चव चाखली आहे. गावातील विकासकामे करण्यापासून ते ग्रामपंचायतीचा कारभार करण्यापर्यत काका गटाचे काही सदस्य आघाडीवर होते. ही बाब काही लोकांना रुचली नाही. त्यामुळे काका गटात संतापाचे वातावरण पसरले आहे. खा. काका गटाच्या काही सदस्यांनी आबा गटाशी केलेली जवळीक हीच काका गटात उभी फूट पडण्यास कारणीभूत ठरली आहे. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख