खडसेंनी 'रिट्वीट' केले जयंत पाटलांचे 'ते' ट्वीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाबाबत टीका करणारे केलेले ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट्वीट करत पाटील यांच्या मुद्द्याला आपला पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षपणे दर्शवून दिले आहे
Ekanath Khadse Retweeted Jayant Patil Tweet
Ekanath Khadse Retweeted Jayant Patil Tweet

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाबाबत टीका करणारे केलेले ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट्वीट करत पाटील यांच्या मुद्द्याला आपला पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षपणे दर्शवून दिले आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन खडसे यांनी हे रिट्वीट केल्याने एकनाथ खडसे मनाने राष्ट्रवादीच्या जवळ गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा रात्री आठच्या सुमाराला देशाला मार्गदर्शन करत असतात. पण काल त्यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. अनेकांना वाटले काही तरी मोठी घोषणा होणार आहे. पण प्रत्यक्षात कोणतीच घोषणा न देता कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींचे भाषण सर्वसाधारणतः २० ते २५ मिनिटांचे असते. पण कालचा संदेश पाच  मिनिटांतच संपला. 

त्यावरुन जयंत पाटील यांनी त्यावर टीका करणार ट्वीट केले. ''भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!,'' असे ट्वीट पाटील यांनी काही तासांपूर्वी केले होते. हेच ट्वीट 'रिट्वीट' करत खडसेंनी याला आपला पाठिंबा असल्याचे दर्शवून दिले आहे. 

खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश येत्या गुरुवारी (ता.२२) होणार असल्याचे सर्वात प्रथम वृत्त `सरकारनामा`ने दिले होते. त्याला आता पुष्टी मिळत आहे. खडसेंच्या मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे चिन्ह खडसेंच्या फ्लेक्सवरून हटविण्यास सुरवात केली आहे.

मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडूनही खडसेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जावू नये यासाठी चर्चा केली. याला खडसे यांनीही  दुजोरा दिला. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हा फोन खडसे यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठीच असावा, अशी राजकीय चर्चा आहे. 
Edited By : Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com