पवारांच्या आवाहनास अभिजित पाटलांचा प्रतिसाद : धाराशिव कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प  - Dharashiv sugar factory to set up first oxygen production project in the state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

पवारांच्या आवाहनास अभिजित पाटलांचा प्रतिसाद : धाराशिव कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प 

भारत नागणे
शनिवार, 24 एप्रिल 2021

त्यांनी मौज इंजिनिअरींगच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.

पंढरपूर : राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी आज दिली. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मितीचे प्लॅंट उभे करावेत, असे आवाहन केले आहे. त्यानंतर वसंतदादा शुगर  इन्स्टिट्यूटने ता. २३ एप्रिल रोजी झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेतली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. त्यामध्ये त्यांनी धाराशिव साखर कारखान्यात पहिला ऑक्सीजन प्लॅंट सुरू केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यानुसार त्यांनी मौज इंजिनिअरींगच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.
 
अभिजीत पाटील म्हणाले की, सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सीजनचा तातडीने पुरवठा सुरू व्हावा, यासाठी ‘व्हीएसआय’कडून तशा सूचना केल्या आहेत.

कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘माॅलेक्युलर सिव्ह' वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीच्या कामास सुरवात केली आहे. कारखान्यात प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. राज्यातील पहिला ऑक्सीजन निर्मिती करणारा पायलट प्रकल्प कार्यान्वीत होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

कारखान्यास ऑक्सिजन निर्मितीस लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने द्याव्यात, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकल विभागाला दिल्याचे ही अभिजीत पाटील यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख