साताऱ्यात दोन राजांमध्ये भाजपा विभागणार? - BJP May devided Between Udayanraje and Shivendraraje in Satara | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात दोन राजांमध्ये भाजपा विभागणार?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

आगामी काळात सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांची झुंज सुरु होत असतानाच महाविकास आघाडीने सुध्दा झुंजीची तयारी सुरु केली आहे. सध्यातरी सातारा पालिकेची निवडणूक तीन आघाड्यांत होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी ऐनवेळच्या तहबाजीमुळे हे चित्र पालटू शकते.

सातारा : हद्दवाढीनंतर विस्तारीत भागासह मुळ शहरावरील पकड मजबुत करण्यासाठी खासदार उदयनराजे विकासकामांच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. उदयनराजेंच्या आक्रमकतेमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण ढवळत असतानाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुध्दा गट बांधणी सुरु केली आहे. दोन्ही नेते येत्या निवडणुकीत पुन्हा समोरासमोर ठाकणार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.  

हे दोन पारंपारिक गट आमनेसामने ठाकण्याचे संकेत मिळत असतानाच महाविकास आघाडीनेही शड्डू ठोकत दोन्ही राजांना आव्हान देण्यासाठीची समीकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे.

मनोमिलन मोडत खासदार उदयनराजेंनी गत निवडणुकीत साविआच्या माध्यमातून आपली संपुर्ण ताकद पणाला लावली. सर्वसामान्य, सर्वमान्य या शब्दांचा प्रयोग करत उदयनराजेंनी सर्वसामान्य सातारकरांना यावेळी साद घातली. ऐनवेळच्या मनोमिलन ब्रेकअपनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंना जुळणी करत सर्वच जागांवर नविआचे उमेदवार उभे केले. ती निवडणूक सर्वमान्य विरुध्द राजमान्य या दोन शब्दांभोवतीच फिरवण्यात उदयनराजेंना यश आले. त्याची परिणीती वेदांतिकराजे भोसले यांच्या पराभवात झाली. प्रतिष्ठेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत वेदांतिकाराजे पराभुत झाल्याने नविआच्या निस्तेजीकरण झाले. याच निवडणूकीत अशोक मोने, अमोल मोहिते यांचे मताधिक्‍य घटले तर अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण पराभूत झाले.

पालिकेतील सत्तेला चार वर्षे पुर्ण होतानाच साताऱ्याची हद्दवाढ झाली. गत निवडणूक इतर मुद्यांसह ग्रेड सेपरेटर, मेडिकल कॉलेज, कास धरण उंची प्रकल्प, हद्दवाढीभोवती फिरली होती. हे मुद्दे निकाली काढल्याचे सांगत गतीमान विकासासाठी सातारा विकास आघाडी हि निवडणूक स्लोगन ग्रेड सेपरेटच्या लोकार्पणावेळी लॉंच करत उदयनराजेंनी निवडणूकीच्या तोफेला बत्ती दिली. विरोधी गटाला निस्तेज करण्यात माहिर असणाऱ्या उदयनराजेंनी इतर विषयांना यानंतर हात घातला. सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्‍नांना हात घालत उदयनराजेंनी सातारकरांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणूक नजरेसमोर ठेवत खासदारांपाठोपाठ शिवेंद्रसिंहराजेंनी सुध्दा गट बांधणीवर जोर दिला आहे. 

गेल्या निवडणुकीत वेदांतिकाराजेंबरोबरच बिनीच्या शिलेदारांच्या पराभवामुळे नविआचे झालेले निस्तेजीकरण दुर करण्यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे. याचबरोबर वाड्यातील गटतटामुळे दुखावलेल्या, दुरावलेल्यांचे आघाडीअंतर्गत मनोमिलन त्यांना घडवून आणावे लागणार आहे. आघाडीची ध्येयधोरणे मांडणाऱ्यांच्या पराभवामुळे पालिका सभागृहातील नविआचा आवाज क्षीण झाला आहे. पालिका सभागृहातील आवाज बुलंद करण्याबरोबरच शिवेंद्रराजेंना ठोस विकासात्मक कामांच्या माध्यमातून सातारकरांना आपल्याकडे आकर्षिंत करावे लागणार आहे.

आगामी काळात सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांची झुंज सुरु होत असतानाच महाविकास आघाडीने सुध्दा झुंजीची तयारी सुरु केली आहे. सध्यातरी सातारा पालिकेची निवडणूक तीन आघाड्यांत होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी ऐनवेळच्या तहबाजीमुळे हे चित्र पालटू शकते.

भाजपा अर्धी इकडे अर्धी तिकडे
पालिका सभागृहात भाजपाचे सहा नगरसेवक आहेत. दोन्ही राजे भाजपात आल्याने ते नगरसेवक सुध्दा आपसुक दोन गटात विभागले गेले. आगामी निवडणूक दोन्ही राजांनी पक्षाच्या चिन्हावर लढवावी, अशी पक्षीय पातळीवर मागणी होत आहे. या मागणीला दोन्ही राजांकडून सध्यातरी प्रतिसाद मिळालेला नाही.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख