Which CM Got Highest Change For Vitthal Pooja in Pandharpur | Sarkarnama

'या' मुख्यमंत्र्यांना मिळाला होता सहा वेळा श्री विठ्ठलाच्या महापुजेचा मान

विलास काटे
मंगळवार, 30 जून 2020

पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही महापूजा करण्याचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे जातो. त्यांना सहा वेळा हा मान मिळाला आहे.

आळंदी :  पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही महापूजा करण्याचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे जातो. त्यांना सहा वेळा हा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आषाढीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची पूजा करुन राज्याच्या भल्यासाठी साकडे घालतात. विलासराव देशमुख यांच्यानंतर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा महापुजेचा मान मिळाला आहे. 

राज्याबाहेरील मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांनी दोनदा तर राज्यपाल म्हणून शंकरदयाळ शर्मा, सी. सुब्रहण्याम यांना प्रत्येकी एकदा मान मिळाला. मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, सुशिल कुमार शिंदे यांना प्रत्येकी एकदा मान मिळाला. तर पी.के.सावंत, वसंतदादा पाटील, बॅ.ए.आर अंतुले,सुधारकर नाईक आणि बाबासाहेब भोसले यांना मात्र मुख्यमंत्री असताना एकदाही पुजेची संधी मिळाल्याचा उल्लेख नाही. 

सन १९६० ला प्रांत आर. डी.शिंगरे यांना श्री. विठ्ठलाच्या महापुजेचा मान मिळ्यानंतर सन १९६१ व ६२ मधिल पुजेबाबत मंदिर समितीकडे उल्लेख नाही. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत उल्लेख नाही. त्यानंतरचे  दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी सन १९६३ साली मुख्यमंत्री म्हणून पहिल्या पुजेचा मान मिळवल्याचा उल्लेख श्री विठ्ठल मंदिर समितीमधे आहे. 

१९६४ ला सोलापूरचे सहायक जिल्हाधिकारी पु. स. पाळंदे यांनी पुजा केली. राजारामबापू पाटील यांना सन १९६५(महसूलमंत्री) व १९७९ (ग्रामविकासमंत्री) ला मान मिळाला. सन १९६६ मधे पुजेबाबत नोंद नाही. सन १९६७ मधे भाऊसाहेब वर्तक(पुरवठा मंत्री),सन १९६८ ला कल्याणराव पाटील, सन १९६९ ला बाळासाहेब देसाई (महसूलमंत्री) तर सन १९७० व ७१ ला आबासाहेब पारवेकर(माहिती खात्याचे राज्यमंत्री) यांना पुजेचा मान मिळाला. सन १९७२ ला दुष्काळामुळे सरकारी पुजा झाली नाही. सन १९७३, ७४, ७५ ला देवस्थानचे पंच यांच्यावतीने पुजा झाली. 

सन १९७६ मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण,सन १९७७ ला मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून शालिनीताई पाटील, सन १९७८ ला विधानसभेचे उपसभापती गजानन गरूड, सन १९७९ ला ग्रामविकासमंत्री राजारामबापू पाटील, सन १९८० ला माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी परिवहन व कामगार मंत्री असताना पुजा केली. सन १९७७ व १९८१ ला मुख्यमंत्री वसंतदादाच्या पत्नि शालिनीताई पाटील (महसुलमंत्री) यांनी पुजा केली. सन १९८२ माणिकराव भामले(पाटबंधारे राज्यमंत्री), सन १९८३ बाबत माहिती उपलब्ध नाही. 

सन १९८४ ला  नानाभाऊ एवंडवार(कृषिमंत्री), सन १९८५-८६ बाबात माहिती उपलब्ध नाही.  सन १९८७ ला डॉ.शंकर दयाळ शर्मा आणि १९९१ ला सी. सुब्रहण्यम यांनी राज्यपाल असताना पुजा केली. सन १९८८ ते  १९९० आणि १९९३ असे चार वेळा शरद पवार यांना मुख्यमंत्री असताना पुजेचा मान मिळाला. सन १९९२ छगन भुजबळ(महसूलमंत्री) यांना मान मिळाला.  सन १९९४ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांना राज्याचे पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासोबत तर १९९७ ला राज्याचे मुख्य सचिव दिनेश अफझलपूरकर यांच्या सोबत असा दोनदा पुजेचा मान मिळाला. 

सन १९९५, ९६, ९८ युती सरकारच्या वेळी मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री असताना पुजेचा मान मिळाला.  त्यानंतर सन १९९९ ला नारायण राणेंना मुख्यमंत्री असताना मान मिळाला.  सन २००० ते०१ आणि सन २००५ ते ०८ असे तब्बल सहा वेळा विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री असताना मान मिळाला. सन २००२ आणि २००४,२००९  बाबत माहिती उपलब्ध नाही. तर सन २००३ ला सुशिलकुमार शिंदे(मुख्यमंत्री), सन २०१० ला अशोक चव्हाण(मुख्यमंत्री), सन २०११ ते २०१४ अशी सलग चार वर्षे पृथ्वीराज चव्हाण(मुख्यमंत्री), सन २०१५ ते २०१७ तीन वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुजेचा मान मिळाला.

त्यानंतर २०१८ ला मराठा आंदोलन असल्याने देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनाचा फटका बसला आणि त्यांना पंढरपूरा येता आले नाही. त्यावेळी त्यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावरच विठ्टलाची मुर्ती चौरंगावर मांडून पुजा केली.सोशल मिडियावर याबाबत उलटसुलट चर्चा झाली होती.  त्यानंतर चौथ्यांदा २०१९ ला पुन्हा देवेंद्र फडणवीस(मुख्यमंत्री)असताना पुजा केली.

असा राहिला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल
सन १९६२ ला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. 
१९६२ ते ६३ मारोतराव कन्नमवार यांचे तिनशे सत्तर दिवस कार्यकाल होता. 
पी.के सावंत सन १९६३ ला अवघ्या दहा दिवसांचे मुख्यमंत्री होते.
वसंतराव नाईक१९६३ ते ७५ मुख्यमंत्री होते.
शंकरराव चव्हाण १९७५ ते ७७, 
वसंतदादा पाटील १९७७ ते ७८ चारशे सत्तावीस दिवसांचे सरकार होते
शरद पवार १९७८ ते १९८० पाचशे ऐशी दिवसांचे पुलोदचे सरकार होते
सन १९८० ला राष्ट्रपती शासन एकशे तेरा दिवस होते
त्यानंतर सन १९८० ते १९८२ पाचशे त्रेऐशी दिवस बॅ.ए.आर.अंतुले मुख्यमंत्री झाले
सन १९८२ ते ८३ तिनशे सत्त्याहत्तर दिवसांचे मुख्यमंत्री होते
सन १९८३ ते ८५ साडे आठशे दिवस वसंतादादां पाटील मुख्यमंत्री होते
शिवाजीराव निलंगेकर सन १९८५ ते ८६ दोनशे सत्त्याहत्तर दिवस मुख्यमंत्री होते
८६ ते ८८ आठशे सदतिस दिवस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते
सन ८८ ते ९१ एक हजार चौ-यान्नव दिवस शरद पवार आणि ९१ ते ९३ सहाशे आठ दिवस सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते
शरद पवार पुन्हा ९३ ते ९५ सातशे एकोण चाळीस दिवस मुख्यमंत्री होते
मनोहर जोशी सन ९५ ते ९९ चौदाशे नव्व्यान्नव दिवस तर  नारायण राणे सन ९९ साली दोनशे एकोणसाठ दिवस मुख्यमंत्री होते
१९९९ ते २००३ विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे २००३ ते २००४ सहाशे एकावन्न दिवस मुख्यमंत्री होते
२००४ ते २०००८ विलास राव देशमुख मुख्यमंत्री होते
२००८ ते २०१० अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते
२०१० ते २०१४ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते
२०१४ ते १९ देवेंद्र फडणवीस होते
तर २०१९ पासून उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख