Over Twelve Thousand Will Miss Haj Pilgrimage This Year | Sarkarnama

राज्यात १२ हजार ३४९ भाविकांची हज यात्रेची संधी हुकली

शेखलाल शेख
सोमवार, 29 जून 2020

देशभरातून दरवर्षी जवळपास १ लाख ७५ हजार भाविक हज यात्रा करतात. केंद्रीय हज समितीकडे त्यापैकी १ लाख ४० हजार यात्रेकरूंचा कोटा असतो. यंदा सौदी प्रशासनाने कोरोनामुळे बाहेरील देशांतील भाविकांना हजसाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा कुणालाही हजला जाता येणार नाही.

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी हजला जाता यावे, अशी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची इच्छा असते.  कारण, इस्लाम धर्मातील प्रमुख पाच स्तंभांपैकी 'हज' एक महत्त्वाचे मानले जाते. अनेकजण हजसाठी  कष्टाने एक-एक रुपया जमा करुन ठेवतात व यात्रा करतात. यंदा मात्र कोरोनामुळे मुस्लिम भाविकांना हजला जाता येणार नाही. महाराष्ट्रात जवळपास १२ हजार ३४९ भाविकांना नंबर लागूनसुद्धा सौदी प्रशासनाच्या निर्णयामुळे हज यात्रेला मुकावे लागणार आहे.

देशभरातून दरवर्षी जवळपास १ लाख ७५ हजार भाविक हज यात्रा करतात. केंद्रीय हज समितीकडे त्यापैकी १ लाख ४० हजार यात्रेकरूंचा कोटा असतो. यंदा सौदी प्रशासनाने कोरोनामुळे बाहेरील देशांतील भाविकांना हजसाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा कुणालाही हजला जाता येणार नाही. हजला जाण्यासाठी मोठी तयारी असते. यात्रेला जाण्यापूर्वी नातेवाईक, मित्रपरिवार यांना निमंत्रण दिले जाते. प्रशिक्षणही घेतले जाते. मात्र, यंदा नंबर लागूनसुद्धा हजला जाता येणार नाही. कोरोनामुळे यात्रेची ही संधी हिरावल्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.

हजारांहून जास्त भाविक होते ७० वर्षांचे

१० हजार ४०८ भाविकांचा सोडतीत पहिल्यांदा नंबर लागला होता. तर यंदा राज्यातून ज्यांचा नंबर लागला त्यामध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १ हजार ९१० भाविक होते. तसेच विना मेहरम ३१ महिलांचा सुद्धा हजसाठी नंबर लागलेला होता. यामध्ये मराठवाड्यातील ३,२०० तर औरंगाबाद जिल्ह्यातील ९३४ भाविक होते. नंबर लागला असल्याने या सर्वांनी हजला जाण्याची तयारी केली होती. या सर्वांनी हज समितीकडे ८१ हजारांचा पहिला तर १ लाख २० हजार रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला होता. सर्व काही सुरळीत झाले असते तर भाविकांना जुलैमध्ये हजला जाता आले असते. तसेच ऑगस्टमध्ये त्यांची यात्रा पूर्ण झाली असती.

लवकरच परतावा देणार

यंदाची हज यात्राच होणार नसल्याने भाविकांचे पैसे परत देण्याची तयारी हज समितीकडून सुरू झालेली आहे. भाविकांनी अर्ज करतानाच त्यांच्या बँकेचा तपशील दिलेला आहे. आता महिनाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून देशभरातील भाविकांच्या थेट खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. ज्यांच्या बँकेच्या खात्यात बदल असेल, अशा भाविकांनी हज समितीला ई-मेलद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख