उस्मानाबादला व्ही.आय.पी. सेल्फी पॉईंट घोषित करा : मनसेने लावले बॅनर - MNS Demands to Declare Osmanabad as Selfie Point | Politics Marathi News - Sarkarnama

उस्मानाबादला व्ही.आय.पी. सेल्फी पॉईंट घोषित करा : मनसेने लावले बॅनर

विश्वभूषण लिमये
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यामध्ये आजपर्यंत राज्यातील प्रत्येक महत्वाच्या नेत्याचा पाहणी दौरा झाला आहे, मात्र अद्याप मदत कोणीच जाहीर केली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा सेल्फी पाॅईंट जाहीर करा, असे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावले आहेत. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच अतोनात नुकसान झालं आहे, त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत.  जिल्ह्यामध्ये आजपर्यंत राज्यातील प्रत्येक महत्वाच्या नेत्याचा पाहणी दौरा झाला आहे, मात्र अद्याप मदत कोणीच जाहीर केली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा सेल्फी पाॅईंट जाहीर करा, असे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावले आहेत. 

काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते काटगावकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांसोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ही काटगावकडे रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांसह राज्याचे इतर मंत्री तसेच विरोधी पक्षांचे नेते मराठवाड्याचा दौरा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरस्थिती पाहणी दौरा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दौरा करत आहेत.

या दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. तर आम्ही प्रक्रियेप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करत आहोत, असा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा दावा आहे. केंद्राने आमचे पैसे दिलेले नाहीत, ते पैसे द्यावेत म्हणजे शेतकऱ्यांना मदत करता येईल, असा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे कर्ज काढण्याचा उपाय पवार यांनी सुचवला आहे. 

'परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः: हाहा:कार माजविला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीसाठी आर्जव करतो आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे,' असे आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कधी मदत मिळणार हा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यातूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दौरा करणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे. उस्मानाबाद जिल्हा सेल्फी पाॅईंट जाहीर करा, असे बॅनरच मनसेने लावले आहेत.
Edited By : Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख