अवघ्या दोन ओळींत एकनाथ खडसेंनी तोडला भाजपशी संबंध - Khadse Wrote Two liner resignation letter to BJP | Politics Marathi News - Sarkarnama

अवघ्या दोन ओळींत एकनाथ खडसेंनी तोडला भाजपशी संबंध

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज भाजपचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. केवळ दोन ओळींच्या राजीनाम्यातून खडसे यांनी भाजपशी असलेले आपले काही दशकांचे संबंध संपुष्टात आणले आहेत

पुणे : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज भाजपचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. केवळ दोन ओळींच्या राजीनाम्यातून खडसे यांनी भाजपशी असलेले आपले काही दशकांचे संबंध संपुष्टात आणले आहेत. 

भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड प्रकरणावरुन खडसेंना महसूलमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना कुठलीही जबाबदारी दिली नाही. त्यामुळे खडसे अस्वस्थ होते. गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरु होती. अखेर आज ती वेळ आली. 'मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या व्यक्तीगत कारणासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,' एवढे दोन ओळींचे पत्र लिहून खडसेंनी पक्षाला रामराम ठोकला. 

पक्ष सोडताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीचीही मागणी कुणी केली नव्हती. पण तरीही राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्र फडणवीसांबाबत आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखे आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण फडणवीसांनी केले. माझा परिवाराला यामुळे मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळाले किंवा नाही मिळालं याचेदुख नाही, असे खडसे म्हणाले आहेत. 

दरम्यान, नाथाभाऊंना भाजपने भरपूर संधी दिली.मात्र त्यांचं पक्षातून जाणं हे पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप करून दुर्दैवी वेळ आणली त्याच पक्षात ते जातायत हे दुर्दैव आहे.,नाथाभाऊंनी पक्षात अजून थांबायला हवं होतं. त्यांच्या विरोधात न्यायालयात काही प्रकरणं सुरु आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्यांना पक्षात न्याय देता आला असता. मात्र या प्रकरणाचा निकाल न लागताच त्यांना न्याय दिला असता तर याच पक्षाने आमच्यावर टीका केली असती, असंही दानवे म्हणाले
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख