'सगळ्यांनीच फसवले'..शेतकऱ्याने लावलेल्या फ्लेक्सची बुलडाण्यात चर्चा - Buldana Farmer placed Board in Farm about loan Waiver | Politics Marathi News - Sarkarnama

'सगळ्यांनीच फसवले'..शेतकऱ्याने लावलेल्या फ्लेक्सची बुलडाण्यात चर्चा

संजय जाधव
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

या भिलखेड गावात जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नसल्याचं गावातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. या चक्रातून शेतकरी देखील सुटलेला नाही. कोरोनाचा फटका आता शेतकरी कर्जमाफीला देखील बसला आहे.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिपते यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या फ्लेक्सची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. 

नीलकंठ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची भिलखेड येथे दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र संग्रामपूर शाखेचं २०११ पासून एक लाख ४८ हजाराचं कर्ज आहे. यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफीसाठी अर्ज केला होता व आताही वर्तमान ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला होता.

पण दोन्ही सरकारच्या काळात त्याना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठा फ्लेक्स लावला आहे.जिल्हयातील भिलखेड या गावातील उद्विग्न शेतकाऱ्याने आपल्या शेतात मोठा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवर 'फसवी कर्जमाफी" तसंच 'या दोन्ही सरकारच्या काळात मला कर्जमाफी झालीच नाही' असा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावले आहेत. 

या भिलखेड गावात जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नसल्याचं गावातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. या चक्रातून शेतकरी देखील सुटलेला नाही. कोरोनाचा फटका आता शेतकरी कर्जमाफीला देखील बसला आहे. परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख