Rohit Pawar reminds Modi of Vajpayee! | Sarkarnama

रोहित पवारांनी मोदींना वाजपेयी यांची आठवण करून दिली!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

आज केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधी पक्षाचं राजकारण नेमकं विसंगत सुरू आहे. 

पुणे :  काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगापुढे भारताची बाजू मांडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवलं होतं. विरोधी पक्षात असूनही या कामासाठी वाजपेयी जी हे सक्षम असल्याची त्यांची खात्री होती आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत वाजपेयींनीही भारताची बाजू भक्कमपणे मांडली. पण आज केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधी पक्षाचं राजकारण नेमकं विसंगत सुरू आहे, अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक वर केली आहे. 

या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात की जबाबदार पंतप्रधान आणि तेवढाच जबाबदार विरोधी पक्ष नेता याची अनेक उदाहरणे भारताने जगाला दाखवून दिली आहे. मग विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्याचा विषय असो किंवा परकीय आक्रमणासारख्या अनेक संकटात विरोधी पक्षाने सरकारला संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्याचा विषय असो, अशी अनेक उदाहरणे आहेत. पण असंच आणखी एक उदाहरण सांगण्याचा मोह आवरत नाही.

 काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगापुढे भारताची बाजू मांडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवलं होतं. विरोधी पक्षात असूनही या कामासाठी वाजपेयी जी हे सक्षम असल्याची त्यांची खात्री होती आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत वाजपेयींनीही भारताची बाजू भक्कमपणे मांडली. 

विरोधी पक्षनेता भारताची बाजू मांडताना पाहून पाकिस्तानी नेत्यांचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे यासाठी सांगावं लागतंय की, आज काय परिस्थिती आहे. वाजपेयी जी ज्या पक्षाचे होते तो भाजप आज केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आहे. कोरोनाने जगासोबतच संपूर्ण भारतात थैमान घातलं आहे. त्यासाठी सगळी राज्य सरकारे आणि सगळे विरोधी पक्ष यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.

केंद्रात विरोधी बाकावर असलेल्या पवार साहेबांसारख्या सर्वांत अनुभवी नेत्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून अनेक बाबी सरकारपर्यंत पोचवल्या जात आहेत. माझ्यासारख्या अनेक लोकप्रतिनिधींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सरकारपर्यंत पोचवले आहेत. पण आज केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधी पक्षाचं राजकारण नेमकं विसंगत सुरू आहे. 

देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाला एकत्रितपणे परतवून लावण्याऐवजी फक्त विरोधासाठी विरोध केला जातोय. मुंबईमध्ये मदत/सहकार्य करायचं तर सोडूनच द्या, पण पॉझिटिव्ह पेशंटच्या संख्येवरुन केवळ टीकेचा सूर आळवला जात आहे. 

 

वास्तविक देशाची आर्थिक राजधानी असलेलं चोवीस तास सुरू राहणारं मुंबई हे एक महत्त्वाचं शहर आहे. मुंबईची लोकसंख्या, घनता, परदेशातून मुंबईत येणाऱ्या लोकांची संख्या याचा विचार करता इथे कोरोनाला प्रतिबंध घालणं काहीसं गुंतागुंतीचं काम आहे. तरीही सरकार करत असलेले निकराचे प्रयत्न आणि कोरोना योद्धे अहोरात्र देत असलेलं योगदान याकडे कानाडोळा करता येणार नाही. 

विरोधी पक्षातील सक्षम लोकांनाही विश्वासात घ्यावं लागेल

विरोधकांची टिका ही अनाठायी असल्याचं स्पष्ट होतं. ही सगळी पार्श्वभूमी पाहिली तर मोदी जी स्वतः वाजपेयींचा एवढा आदर-सन्मान करत असताना हाच आदर्श भाजपा कुठे तरी विसरल्याचं दिसत आहे. पण असा विसर पडून चालणार नाही तर केंद्रातील सरकारने विरोधी पक्षातील सक्षम लोकांनाही विश्वासात घ्यावं लागेल आणि राज्यातील काही लोकांची फक्त विरोध करण्याची भूमिका बदलायला सांगून सरकारला सहकार्य करायला सांगावं लागेल. शेवटी दोघांच्याही एकत्रित प्रयत्नांतूनच आपण देशावर आलेल्या या आपत्तीतून मार्ग काढू शकतो आणि कदाचित त्यासाठी हीच वेळ योग्य आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख