लग्नात गोंधळ घालणाऱ्या निलंबित जिल्हाधिकाऱ्यांची किरण गित्ते करणार चौकशी - Panel to probe conduct of district magistrate at wedding ceremonies | Politics Marathi News - Sarkarnama

लग्नात गोंधळ घालणाऱ्या निलंबित जिल्हाधिकाऱ्यांची किरण गित्ते करणार चौकशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

लग्न समारंभांवर पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकणारे पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकाऱ्यांची कृती सध्या देशभर गाजत आहे.

आगरतळा : लग्न समारंभांवर पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकणारे पश्चिम त्रिपुराचे (Tripura) जिल्हाधिकाऱ्यांची कृती सध्या देशभर गाजत आहे. अनेकांनी या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. तर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे समर्थनही केले आहे. या वादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागत कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचे म्हटले आहे. या प्रकारानंतर त्यांना निलंबित करण्यात आले असून दोन सदस्यांची समिती चौकशीसाठी नेमण्यात आली आहे.

त्रिपुरामधील दोन लग्न समारंभांवर जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव (Shailesh Kumar Yadav) यांनी नुकताच छापा टाकला होता. यावेळी त्यांनी वधू-वरासह वऱ्हाडींना अपमानित करून मंडपाबाहेर काढले. काहींना लाठ्याही खाव्या लागल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचे आरोपही होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपच्या पाच आमदारांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करत निलंबित केले असून राज्याच्या मुख्य सचिवांकडे या प्रकाराचा अहवाल मागितला आहे. 

राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार यांनी दोन आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये नगरविकास विभागाचे किरण गित्ते (Kiran Gitte) व आयएएस अधिकारी तनुश्री देववर्मा यांचा समावेश आहे. त्यांना चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

कोण आहेत किरण गित्ते?

किरण गित्ते हे सध्या त्रिपुराच्या नगर विकास विभागाचे सचिव आहेत. तसेच आगरतळा स्मार्ट सिटीचे अध्यक्षही आहेत. शैलेश यादव हे स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. गित्ते हे मुळचे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून त्रिपुरा केडरचे 2005 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते पाच वर्षे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. 2019 मध्ये ते पुन्हा त्रिपुराला गेले. या कालावधीत ते पुणे महानगर विकास प्राधिकरण म्हणजे PMRDAचे आयुक्त होते. या काळात त्यांनी पीएमआरडीएचा एकात्मिक आराखडा तयार केला. तसेच हिंजवडी-पुणे मेट्रोची पायाभरणीही त्यांच्याच काळात झाली. त्याआधी अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. 

काय केले शैलेश यादव यांनी?

पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी दोन दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात छाप टाकला होता. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटाही होता. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शैलेश यादव हे अत्यंत रागात दिसत आहेत. कोरोनाचा प्रोटोकोल तोडला म्हणून ते लग्नात उपस्थित सर्वांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. त्यांनी नवरदेवाला धक्का मारून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच ज्येष्ठांनाही असभ्य भाषेत बोलत अपमानित करून बाहेर काढले. त्यांनी पोलिसांनाही अपशब्द वापरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

लग्नासाठी परवानगी घेतलेले पत्र यादव यांना दिल्यानंतर त्यांनी ते फाडून वऱ्हाडींच्या अंगावर फेकून दिले. या कारवाईत अडथळा आणल्याचे कारण पुढे करून काहींवर ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी तिथेच पोलिसांना दिले. जवळपास 30 जणांना त्यांनी ताब्यात घेतले. तसेच गुन्हाही दाखल केला. काही जणांवर पोलिसांनी लाठीहल्लाही केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. 

शैलेश यादव यांनी मागितली माफी

सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यादव यांनी माफी मागितली आहे. आपला उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख