Maharashtra will not bow before Delhi's throne : Pawar warns again | Sarkarnama

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही : पवारांचा पुन्हा इशारा 

संपत मोरे 
बुधवार, 1 जुलै 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर "दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हा इतिहास आहे.' हे प्रोफाइल चित्र पुन्हा अपलोड करण्यात आले आहे.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर "दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हा इतिहास आहे.' हे प्रोफाइल चित्र पुन्हा अपलोड करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या अकाउंटवर हे चित्र अपलोड केले होते. आता तेच चित्र पुन्हा अपलोड करण्यात आल्याने राज्यभर एकच चर्चा सुरू झाली आहे. 

 

शरद पवार यांच्या फेसबुक अकाउंटवर आज (ता. 1 जुलै) दुपारी दीडच्या सुमारास "दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हा इतिहास आहे,' असा मजकूर आणि सोबत पवार यांचा फोटो असे चित्र अपलोड करण्यात आले आहे. हा इशारा आहे काय? आणि इशारा असेल तर कोणाला? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनेक नेते सोडून गेले होते. त्यातील अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली होती. वयाचा विचार न करता आणि आजारपणावर मात करत ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले होते. सगळीकडे ऐंशी वर्षांचा तरुण अशी उपमा शरद पवार यांना दिली जात होती. 

या दरम्यान अनेक लक्ष वेधून घेणारे फलक उभारले जात होते. विजयाची खात्री नसतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांची लढण्याची जिद्द पाहून प्रेरणा घेत होते. त्याचकाळात शरद पवार यांना ईडीची नोटीस आली. त्याच्या काही काळानंतर नंतर "दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हा इतिहास आहे' असे प्रोफाइल चित्र त्यांच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड झाले होते. तेव्हा दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांना डोळ्यासमोर ठेवून हा इशारा देण्यात आला होता. आजही तेच चित्र अपलोड झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही हाच इशारा दिला होता. तत्पूर्वी 1999 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना करताना महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही, असाच इशारा दिलेला होता. त्यामुळे शरद पवार पुन्हा नवे कोणते पाउल उचलतात, या कडे राजकीय धुरिणींचे लक्ष लागले आहे. 

चीनच्या मुद्द्यावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टिका आणि त्या टिकेबाबत शरद पवार यांनी केलेले विधान. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून झालेली विधाने आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये झालेला संभ्रम या संदर्भानेही चर्चा सुरू झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख