खर्गे यांना हटवले; एच. के. पाटील नवे प्रभारी : कॉंग्रेस कार्यकारिणीत मोठे बदल 

कार्यकारिणीमध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. मात्र, कार्यकारिणीत स्थान मिळण्याची चर्चा असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र नव्या फेररचनेतही संधी मिळू शकली नाही.
Kharge removed from charge of Maharashtra; H. K. Patil new in-charge
Kharge removed from charge of Maharashtra; H. K. Patil new in-charge

नवी दिल्ली : कॉंग्रेसने आज (ता. 11 सप्टेंबर) राष्ट्रीय कार्यकारिणीची तडकाफडकी फेररचना केली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करून नवे चेहरे आणले आहेत. यात महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी एच. के. पाटील या दुसऱ्या कर्नाटकच्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कार्यकारिणीमध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. मात्र, कार्यकारिणीत स्थान मिळण्याची चर्चा असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र नव्या फेररचनेतही संधी मिळू शकली नाही. कॉंग्रेस पक्षसंघटनेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक यंत्रणा स्थापन करून त्याची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री या राहुल गांधी यांच्या निकटच्या नेत्याकडे दिली आहे. 

कॉंग्रेसने संघटनात्मक बदल आज रात्री उशिरा जाहीर केले. सोनिया गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे आली आहे. नव्या बदलामध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत. 

गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, खर्गे, मोतीलाल व्होरा यांना सरचिटणीस म्हणून दूर करण्यात आले आहे. मात्र, व्होरा वगळता अन्य तिघांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. आझाद, आनंद शर्मा व मुकुल वासनिक या असंतुष्ट 23 मधील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देणे महत्त्वपूर्ण आहे. पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादीमधून कॉंग्रेसमध्ये परतलेले तारिक अन्वर यांना प्रथमच कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. दिग्विजयसिंह, जयराम रमेश यांना कायम निमंत्रित म्हणून ठेवण्यात आले आहे. मोतीलाल व्होरा यांच्याकडे असलेली सरचिटणीस कार्यालय प्रशासनाची जबाबदारी पवनकुमार बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

सोनिया गांधींच्या मदतीसाठी समिती 

अखिल भारतीय कॉंग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत सोनिया गांधी यांनी दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आला आहे. 

आझादांकडून हरियानाची जबाबदारी काढली 

काही राज्यांचे प्रभारीही बदलण्यात आले असून, त्यात महाराष्ट्राची जबाबदारी खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. हरियानाच्या जबाबदारीतून गुलामनबी आझाद यांना मुक्त करण्यात आले असून विवेक बन्सल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याऐवजी तारिक अन्वर यांच्याकडे केरळ व लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक, रजनी पाटील यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर तर राजीव शुक्‍ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com