कोरोना रोखण्यासाठी 'ही' चार शहरे ठरताहेत रोल मॉडेल

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या शहरांनी रूग्णसंख्या वाढ व मृत्यूदर हे दोन्ही रोखून धरण्यात प्रभावी कामगिरी बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रयत्नांचीही केंद्राने प्रशंसा केली आहे.
four cities became role model for corona prevention
four cities became role model for corona prevention

नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चांगल्या उपाययोजना करणाऱ्या जयपूर, इंदूर, चेन्नई व बंगळूर या चार शहरांना केंद्र सरकारने रोल मॉडेल म्हणजेच आदर्श शहरे मानली आहेत. कोरोनाचा हल्ला अत्यंत प्रभावीपणे रोखून जागतिक पातळीवर छाप पाडणाऱ्या केरळमधील एकही महानगर-शहर केंद्रीय यंत्रणेच्या नजरेस पडलेले नाही, याकडेही जाणकारांनी लक्ष वेधले आहे. 

चार शहरांचे प्रयत्न 

इंदूर व जयपूर या शहरांनी कोरोनाचे मोठ्या संख्येने रूग्ण वाढूनही त्यांचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केले. तर चेन्नई व बंगळूर या महानगरांनी मृत्यूदर चांगलाच आटोक्यात ठेवला आहे. मोठ्या शहरांत लोकसंख्येची घनता असलेल्या भागांत जास्त फैलाव व झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष ही प्रमुख आव्हाने असतात. इंदूर व जयपूर महापालिका व राज्य यंत्रणांनी रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागताच घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी विशेष पथके नेमली व ही पथके नेमून दिलेले काम चोख पार पाडत आहेत. जयपूरमध्ये दूध, किराणामाल व भाजीविक्री दुकाने-स्टॉल येथे महापालिका व आरोग्य विभाग कर्माची व पोलिकांनी कडक नजर ठेवली व तेथे वारंवार सॅनिटायझेशनसह सोशल डिस्टन्सिंगची कडक अंमलबजावणी केली. तुलनेने अधिक गर्दी होणाऱ्या दुकानांवर लोकांना नियमांची अंमलबजावणी सक्त पद्धतीने केली. 

चेन्नई व बंगळूर या दोन महानगरांत रूग्णसंख्या वाढूनही मृत्यूदर जेमतेम एकच टक्का राहिलेला आहे. या दोन्ही ठिकाणच्या यंत्रणांनी उपलब्ध व्हेंटिलेटरचा अतिशय चांगला वापर केला व अतिदक्षता विभागांतील रूग्णसंख्या वेळोवेळी निश्चित करून त्यांची एकाच रूग्णालयात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. रूग्ण-व्यवस्थापनातील तमिळनाडू व कर्नाटकाच्या लक्षणीय कामगिरीची दखल यापूर्वीच राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. 

मुंबईत विशेष यंत्रणा 

केंद्राच्या या चार रोल मॉडेल शहरांत सर्वाधिक कोरोना प्रभाव असणारा महाराष्ट्रदेखील नसला तरी देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महानगर असलेल्या मुंबईला या महिन्यात भेट देणाऱ्या आरोग्य मंत्रालयाच्या पथकातील सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत खासगी रूग्णालयांचे नेटवर्क तयार करणे व कोरोना उपचारांत त्यांची सक्रिय मदत घेणे ही कामे महापालिका व राज्य सरकारकड़ून प्रभावीपणे सुरू आहेत. विविध रूग्णालयांत उपलब्ध असणाऱ्या खाटांच्या संख्येबाबत माहिती देणारे एक पोर्टलही मुंबईत तयार केले जात आहे व त्यासाठी रिअल टाईम ट्रॅकींगच्या दृष्टीने रूग्णवाहिकांत जीपीएस प्रणाली बसविण्याचेही काम मुंबईत सुरू आहे. या साऱ्या प्रयत्नांमुळे आगामी दोन महिन्यांच्या अत्यंत परीक्षेच्या कालखंडात मुंबईतील आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होईल. 

वारंवार बैठकांचा उद्देश 

लॉकडाउनच्या काळात केंद्राने विविध कोरोनाग्रस्त शहरांच्या महापालिका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर वेळोवेळी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या आहेत. विविध शहरांतील प्रशासनांनी आपापल्या अनुभवांची माहिती इतरांना सांगावी व कोरोना लढाईत त्याचा वापर व्हावा, असा या बैठकांचा उद्देश आहे. विशेषतः रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ वाढविणे, कोरोना रूग्णांवर लवकर व प्रभावी उपचार करणे व मृत्यूदर आटोक्यात ठेवणे या मुख्य विषयांवर या बैठकांचा झोत रहातो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com