माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे निधन 

अरुणाचलचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृह सचिव आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे शुक्रवारी (ता. 31 जुलै) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.
Former Union Home Secretary Ram Pradhan passes away
Former Union Home Secretary Ram Pradhan passes away

मुंबई  : अरुणाचलचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृह सचिव आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे शुक्रवारी (ता. 31 जुलै) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. 

प्रधान यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही प्रधान यांनी काम केले आहे. दिवंगत राजीव गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असणारे प्रधान सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अरुणाचलचे राज्यपाल झाले. राजीव गांधी यांची तरुण पंतप्रधान म्हणून कारकिर्द गाजत असतानाच "आसाम करार' त्यांचा लौकिक वाढवणारा ठरला. या कराराचे शिल्पकार म्हणून राम प्रधान यांना ओळखले जाते. 

राज्यपालपदाची कारकिर्द संपल्यानंतर तसेच, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर प्रधान यांनी सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही पडद्यामागून जबाबदाऱ्या सांभाळल्या. राज्यसभा निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणुकीत मतांची खरेदी-विक्री झाल्याने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर आणि नेहरु सेंटरचे विश्‍वस्त म्हणून काम पाहिले. वृद्धापकाळात त्यांनी अनुभवांवर विस्तृत लेखन केले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्‌विट करून प्रधान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाले. आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. 

यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच नेहरू सेंटर या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि रचनात्मक विधायक कार्यक्रमांना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुद्धिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली! 

एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले : फडणवीस 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. महाराष्ट्र आणि देशातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम केले. 

केंद्रीय गृह सचिव म्हणून त्यांनी पंजाब, आसाम अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीत मोलाचे योगदान दिले आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर चौकशी आयोग त्यांच्याच अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यांच्या जाण्याने हरपले आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

प्रधानांच्या निधनामुळे एक मार्गदर्शक गमावला : अशोक चव्हाण 

राम प्रधान यांच्या निधनावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांच्या रूपात एक मार्गदर्शक गमावल्याचे म्हटले आहे. 

प्रधान यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, शंकरराव चव्हाणांच्या काळापासून माझा त्यांच्याशी परिचय होता. ते एक अभ्यासू, कार्यतत्पर आणि कणखर अधिकारी होते. मागील अनेक वर्षे मी त्यांच्या नियमित संपर्कात होतो व वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शनही घेत होतो. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यात त्यांनी मोठे सहकार्य केले होते. देश व राज्य पातळीवरील अनेक महत्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान होते. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली 

राम प्रधान यांच्या निधनानं राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान देणारं व्यासंगी व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट अधिकारी, सामाजिक प्रश्नांचे जाणकार, सचोटीचं व्यक्तिमत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून प्रधान यांनी काम केलं होतं. देशासमोरच्या अनेक जटील प्रश्नांवर तोडगा काढण्यात, उपाय सुचविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि नेहरु सायन्स सेंटरसारख्या महत्वाच्या संस्थांचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलं.

राज्याच्या, देशाच्या प्रश्नांची जाण असलेल्या प्रधान यांचं निधन ही राज्याची फार मोठी हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com