काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'तारीख पे तारीख'; आता जूनचा मुहूर्त - Congress President Election After State Polls says kc venugopal | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'तारीख पे तारीख'; आता जूनचा मुहूर्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

देशातील पाच राज्यांमधील विधासभेच्या निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे आज स्पष्ट झाले. 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्येही अध्यक्षपदासाठी जून महिन्यात निवडणूक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. देशातील पाच राज्यांमधील विधासभेच्या निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे आज स्पष्ट झाले. 

मागील वर्षी खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत शुक्रवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल पत्रकारांना माहिती दिली. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीमध्ये दोन गटांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवर परस्परविरोधी चर्चा झाल्याचे समजते. एका गटाने तातडीने पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी. चिदंबरम यांचा समावेश होता. या नेत्यांनीच काही निवडणुकांमध्ये पक्षाची हार झाल्यानंतर नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

तर काही नेत्यांनी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा मुद्दा पुढे केला. अध्यक्षपदाची निवडणूक या निवडणुकांनंतर घेण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. पक्षांतर्गत निवडणुकीमुळे विधानसभा निवडणुकांकडे दुर्लक्ष व्हायला नको, असे एका नेत्याने सांगितले. 

हेही वाचा : सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नांवाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवून कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रियंका गांधी-वड्रा काम पाहतील अशीही चर्चा आहे.

निवडणूकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

काही महिन्यांपुर्वी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता. पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला. तर एका गटाने राहुल गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्याबाबत मत व्यक्त केले होते. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख