अकरा दिवसात ५४३ मुलांना कोरोना, बंगळूरसह कर्नाटकात तिसऱ्या लाटेची भीती

मुख्यमंत्र्यांनी तज्ञांची तातडीची बैठक बोलाविली असून संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
अकरा दिवसात ५४३ मुलांना कोरोना, बंगळूरसह कर्नाटकात तिसऱ्या लाटेची भीती
Corona.jpg

बंगळूर : बंगळूरमध्ये तिसऱ्या लाटेची भीती वाढली आहे. बंगळूरसह राज्याच्या इतर भागातही मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, आरोग्य खात्याच्या अधिकृत माहितीनुसार, बंगळूर शहरात केवळ ११ दिवसात ५४३ मुलांना संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी सरकार गांभिर्याने विचार करीत आहे. (In 11 days, 543 children in Korona, Bangalore and Karnataka feared the third wave)

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तज्ञांची तातडीची बैठक बोलाविली असून संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात येणार आहेत.

राज्यात अनलॉक जारी केल्यानंतर सर्वच व्यवहार सामान्य झाले. मुलांमध्ये कोविडचे प्रमाण वाढल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. शहरात ०-१८ वर्षे वयोगटातील ५४३ मुलांना १ ते ११ ऑगस्ट दरम्यान कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. गेल्या जुलैमध्ये ५१० मुलांना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या वाढली. यातून मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
बृहन् बंगळूर महापालिकेने (बीबीएमपी) दिलेल्या माहितीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान, ०-९ वर्षे वयोगटातील २१० मुले आणि १०-१८ वर्षे वयोगटातील ३३३ मुलांमध्ये संसर्ग आढळून आला. यामध्ये २७० मुली आणि २७३ मुले याप्रमाणे एकूण ५४३ मुलांना कोविड झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सरकार २३ ऑगस्टपासून ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची योजना आखत आहे. तशी यापूर्वीच सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. त्यातच मुलांना अद्याप लस न दिल्यामुळे पालक चिंतेत आहेत.

हेही वाचा..

पॉझिटिव्हीटी रेटमध्ये बदल नाही

बंगळूर शहरात संसर्ग वाढत आहे. तथापि, पॉझिटिव्हीटीचा रेट वाढत नाही. बीबीएमपीचे विशेष आयुक्त रणदीप म्हणाले की, जर एका मुलाला संसर्गाचे निदान झाले तर संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. सकारात्मकतेची प्रकरणे सध्या १२-१४ टक्क्यांच्या श्रेणीत आहेत, ती १५ टक्क्यांपेक्षा जास्त नाहीत. मुलांच्या कोविड -१९ प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या जुलैपासून पॉझिटिव्हीटी रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचे बंगळूर महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटले आहे. याचीच दखल घेऊन, संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका रुग्णालयांना अधिक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी म्हटले होते. प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी स्वतंत्र अति दक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in