मुंडे भगिनी व धनंजय मुंडे यांच्यात ट्विटर वॅार; एकमेकांवर जोरदार प्रहार

पंकजा मुंडे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
Twitter war in dhananjay munde and pankaja munde over corona facilities
Twitter war in dhananjay munde and pankaja munde over corona facilities

मुंबई : बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरून पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांच्या जोरदार ट्विटर वॅार सुरू झाले आहे. सुरूवातीला बीडमध्ये कमी प्रमाणात मिळालेल्या लशीचा मुद्दा पुढे करून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. प्रितम मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करून टोला लगावला. धनंजय मुंडे यांनीही मग एकामागोमाग सहा ट्विट करून मुंडे भगिनींना प्रत्युत्तर दिले. 

पंकजा मुंडे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यातील रेमडेसिविर व लशीच्या तुटवड्याची माहिती दिली. ट्विटरवर या पत्रासोबत त्यांनी बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, असे म्हणत धनंजय मुंडेवर निशाणा साधला. प्रितम मुंडे यांनीही माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर जिल्ह्याला मिळालेल्या लशींची आकडेवारी देत मुंडे भगिनींना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल.

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल. जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही मुंडे म्हणाले. 

जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असेही मुंडे यांनी सुनावले.

कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये, असे मुंडे यांनी नमुद केले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com