केंद्रीय मंत्रीपद मी तेव्हाच नाकारले : पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट - That's when I refused the post of Union Minister : Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

केंद्रीय मंत्रीपद मी तेव्हाच नाकारले : पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 जुलै 2021

मी आमदारकीला पराभूत झाले, याचे मला क्षणभरही वाईट वाटत नाही.

मुंबई : मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव राज्यातील नेत्यांकडून देण्यात आला होता. त्यावेळी देऊ करण्यात आलेले मंत्रिपद मी नाकारले होते. माझे अस्तित्व जेव्हा पणाला लागले होते, माझ्याकडे तेव्हा शून्य होते आणि पायाखालची जमीन सरकली होती. त्या वेळी मंत्रिपद नाकारणारी पंकजा मुंडे आज मंत्रिपदासाठी राजीनामा देणार आहे का? आणि तुम्हाला राजीनामा द्यायला लावणार आहे का?, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी केंद्रातील मंत्रिपदाबाबत गौप्यस्फोट केला. (That's when I refused the post of Union Minister : Pankaja Munde )

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी भाजपत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी नसल्याचे सांगितले होते. पण, त्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीला गेल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. होती. शिवाय, मुंडे समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन भाजपवर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : भाजपमधील धर्मयुद्ध, कौरव-पांडव अन् पंकजा मुंडे...

या पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी आज समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रीपदाबाबत भाष्य केले. पंकजा म्हणाल्या, गेल्या आठ दिवसांत मला अनेक लोक भेटले. माझा बीडमध्ये पराभव झाल्यानंतर अनेकांनी आम्ही राजीनामा देतो; आमच्या जागी पंकजा मुंडे यांना निवडणूक लढवायला लावा, अशी विनंती अनेकांनी मला केली होती. पंकजा मुंडेमुळे आम्ही निवडून आलो, असे सांगणारे अनेक आहेत. पण मी पदाची लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही. मला खुर्चीची अपेक्षा नाही. मी असुरक्षित नाही आणि मला कुणाला संपवून नेता व्हायचे नाही. त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे राजीनामे नामंजूर करते आहे, अशी घोषणा त्यांनी भाषणादरम्यान केली.

मी आमदारकीला पराभूत झाले, याचे मला क्षणभरही वाईट वाटत नाही. कारण, राज्यातील जनतेने माझ्या शब्दावर विश्वास टाकून अनेक आमदार आणि खासदारांना निवडून दिले आहे. खूप कष्टांनी लोकं पदावर पोचत असतात, त्यांना त्या पदावरून खेचून मला माझी शक्ती वाढवयाची नाही, तेवढ्या कोत्या मनाची मी नाही. माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. मला शक्तीच दाखवयाची असती आणि दबाव आणायचा असता तर ही जागा पुरली नसती. मला दबाव आणयाचा नाही. आम्ही कधीच कुणासमोर कुठलीही मागणी केलेली नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मी काल दिल्लीत गेले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल, हे त्यांनी मला सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकारे खाऊन तुमच्यापुढे आली असते, असे वाटते का? असा सवालही पंकजा मुंडे यांनी या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख