माॅर्निंग वाॅकला भेटल्यावर चहासाठी राऊतांकडे गेलो : रावसाहेब दानवेंचा दावा - Raosaheb Danve Explains reason of Meeting with Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

माॅर्निंग वाॅकला भेटल्यावर चहासाठी राऊतांकडे गेलो : रावसाहेब दानवेंचा दावा

लक्ष्मण सोळुंके
रविवार, 27 सप्टेंबर 2020

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या उभयतांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे की काय, अशी शंका बोलून दाखवली जात आहे, याबाबत रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

जालना : राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. तशीच माझी व देवेंद्र फडणवीस यांची खासदार संजय राऊत यांच्याशी भेट झाली, असा दावा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं होतं. म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो, असं सांगायला देखील दानवे विसरले नाहीत.

''सध्याच्या परिस्थितीत हे सरकार पडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही मात्र हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष भाजपला देऊ नये," असेही दानवे म्हणाले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत व दानवे यांची भेट झाली होती. "मी आणि राऊत दिल्लीत शेजारी राहतो. माॅर्निंग वाॅकला गेलो असता आमची भेट झाली. त्यानंतर त्यांनी चहाचे निमंत्रण दिल्याने मी त्यांच्याकडे गेलो," असे दानवे म्हणाले. अशीच राऊत व फडणवीस यांची भेट झाली असावी, असा दावा दानवेंनी केला. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या उभयतांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे की काय, अशी शंका बोलून दाखवली जात आहे. मात्र शिवसेनेतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाआघाडी सरकार स्थिर असून अजिबात धोका नसल्याचा दावा केला होता. या मुलाखतीचे कारण आता उघड झाले. त्यामुळे गेले काही तास सुरू असलेल्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.  

प्रत्यक्षात ही भेट बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख